जामनेर। शहरातील मध्यवर्ती असलेल्या सुतारगल्ली भागांमधील ‘मोहन भवन’ या घराचे दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ल मारल्याची घटना घडली आहे. शहरातील विनोदकुमार लोढा यांच्या ‘मोहन भवन’ हे घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील दोघं-तिघं खोल्यांमधील कपाट खोलून लाखो रुपये नेल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भरत काकडे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, प्रजासत्ताकदिनी पाचोरा रस्त्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून लाखोंची चोरी केली होती. त्याच्या तिसर्या दिवशी पुन्हा चोरी झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
सविस्तर असे, घरांमध्ये हॅपी श्वान पथकाद्वारे तपासणी केल्यावर चोरट्यांनी चोरी करून घराबाहेर काही अंतरावर जाऊन चार चाकी वाहनाने निघून गेल्याचे निदर्शनात आले आहे. घर मालक कुटुंबासह मुंबई येथुन परत आल्यानंतर घरातील वस्तूंससह दागिने रोख रकमेची खात्री करून फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी जामनेर पो.स्टे.ला विनोदकुमार जवाहरलाल लोढा (वय 58, रा. मोहनभुवन, सुतारगल्ली, जामनेर) यांच्या फिर्यादीरुन गु.र.नं.59/2022 भा.दं.वि.क.454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राठोड यांच्या आदेशान्वये पीएसआय दीपक मोहीते करीत आहे.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश
अज्ञात चोरट्यांनी घरातून 28 जानेवारी सकाळी 08.30 ते 29 जानेवारी रोजी सकाळी 09.30 वाजेच्या दरम्यान 5 लाख रुपये रोख त्यात 500 व 100, 50, 20, 10 रुपयांचे नोटांचे बंडल, दीड लाख रुपये रकमेच्या सोन्याच्या सहा तोळे वजनाच्या चार बांगड्या, अडीच तोळे वजनाचे मंगळसुत्र, पाच ग्रॅम वजनाची नाकातील नथ, आठ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, पाच ग्रॅम वजनाचे कानातील मोत्याचे लटकण, बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व अंदाजे पाच वजनाच्या पाच/सहा नाकातील फुल्या असे सर्व सोन्याचे दागिने, दीड रुपये किमतीचे चांदीचे दागिने त्यात 500 ग्रॅम वजनाची अत्तरदानी, 500 ग्रॅम वजनाची फुलदाणी 1 किलो वजनाचे चांदीचे शिक्के, 500 ग्रॅम वजनाचे गणपती, कुबेर, लक्ष्मी व कुलदेवतेची मूर्ती, चांदीचे भांडे त्यात ताटली, तीन वाटी, तीन चमचे दोन पानदान व खुळखुळा, 80 हजार रुपये रकमेचे मोत्याचे सोन्यात गुंफलेल्या दोन बांगड्या, पेन्डन्ट असलेले हार असा आठ लाख 80 हजार रुपये रकमेचे सोने व चांदी व मोत्याचे दागदागिने अज्ञात चोरट्यांनी घराच्या समोरील दरवाजाचे कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करुन चोरून नेले. अशा आशयाची फिर्याद दाखल करून जामनेर पो.स्टे.ला नोंद करण्यात आली आहे.