भुसावळ/जामनेर : तीन हजारांची लाच स्वीकारताना जामनेर पंचायत समितीतील कनिष्ठ लिपिक वसंत पंडीत बारी (53, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) यास गुरुवारी सकाळी 11 वाजता जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती. आरोपीला शुक्रवार, 14 रोजी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
तीन हजारांची भोवली लाच
जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील 54 वर्षीय तक्रारदाराचे गायीच्या गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजूर झाले होते मात्र शेड काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात आरोपी वसंत बारी यांनी मंगळवार, 11 जानेवारी तीन हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराला तक्रार द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली व गुरुवारी सापळा रचून त्यास अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपी वसंत बारी यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव व सहकारी करीत आहेत.