जामनेर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आत्महत्या

0

* कारणीभुत दोंषीवर कारवाई करीता जमावाचा ठिय्या
जामनेर । जामनेर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इयत्ता बारावीतील कला शाखेतील प्रवेशपात्र विद्यार्थी असलेल्या केकतनिंभोरा येथील चेतन रामदास सोनवणे (वय-17) वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली.महाविद्यालयात शिकणार्या गावातील विद्यार्थ्यांना चेतनच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांनी शेकडोच्या संख्येने जमावाच्या स्वरूपात महाविद्यालयाकडे धाव घेतली व चेतनच्या आत्महत्या करीता कॉलेज प्रशासनातील काही कर्मचार्‍यांना दोषी ठरवले. व पुर्वग्रह दुषीत भावनेतून काही कर्मचार्‍यांना धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. वेळेवर हजर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजविण्याचा खुप प्रयत्न केला. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेवून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. तेव्हा असंतुष्ठ विद्यार्थ्यांनी लागलीच पोलिस ठाण्याची वाट धरली व तिथे पोहचून ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली.

पोलिस ठाण्यात उपस्थित उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांच्या मार्गदर्शनात गावच्या प्रतिष्ठित मंडळींनी विद्यार्थ्यांची समजूत घातली. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली असून संपूर्ण तपासाअंती कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. विश्‍वसनीय सुंत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे असे समजते की, मयत चेतन याला कॉलेजमधे इयत्ता बारावीतील कला शाखेत प्रवेश देण्यात आलेला होता. तो कॉलेजच्या ड्रेस कोडमधे गेल्या महिनाभरापासून आपल्या वर्गात बसून नियमित शिकत होता. दरम्यान कॉलेज प्रशासनाकडून त्याला केवळ गँप सर्टिफिकेटची रितसर मागणी करण्यात आलेली होती. तेव्हा इतक्या शुल्लक कारणावरून चेतनने आत्महत्या करणे ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. तर इतर विद्यार्थ्यांनाकडून या घटनेला संभाव्य दोषी असणार्‍या कथीत कर्मचार्‍याकडून मयत चेतनचा त्याच्या प्रवेश वैधतेवरून करण्यात आलेला मानसिक छळ हा विषय पोलिस यंत्रणेकडून गंभीरतेने तपासला जात आहे.