जामनेर । तालूक्यासह शहरात नऊ तास होत असलेले विज भारनियमन बंद करण्यात यावे अशा मागण्यांसाठी तालूका शिवसेनेच्या वतीने विज वितरण कार्यालयावर आंदोलन मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांशी चर्चा सुरू असतांना अभियंत्याच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेळीच तिथे हजर असलेले पोलिस उप विभागीय अधिकारी केशव पातोंड यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. सध्या तालूक्यासह शहारात विजेची समस्या नागरिकांना खुप भेडसावत असून विज वितरण कंपनीकडून नऊ ते दहा तासांपर्यंत विज भार नियमन केले जात आहे. त्या विरोधात जामनेर शहरातील जळगाव रोडवरील विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर सोमवार 18 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता.
उपस्थित कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई
दरम्यान शेंदुर्णी येथील शिवसेनेचे पंडित जोहरे हे विज भारनियमना विषयी बोलत असतानांच विषयांतर करून त्यांनी अवैध धंद्यांविषयी बोलणे सुरू केल्याने पातोंड यांनी ज्या विषयी आपण आंदोलन करीत आहात. त्याविषयी आपले म्हणणे मांडा असे सांगितले. त्यामुळे शाब्दीक बोलणे होवून उपस्थित कार्यकर्त्यांना कलम 68 प्रमाणे अटक करून कारवाई करण्यात आली. यावेळी डॉ.मनोहर पाटील,सुधाकर सराफ आदि पदाधिकारी हजर होते. या आंदोलनाच्या वेळी हजर असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा संख्येने पोलिस फौजफाटाच जास्त असल्याचे चित्र दिसून आले.
शाई फेकण्याचा प्रयत्न फासला
मोर्चा आंदोलनातील काही प्रमुख कार्यकर्त्यांशी जामनेरला नव्यानेच बदलून आलेले. उप.कार्यकारी अभियंता व्हि.एच.करेरा हे भार नियमना संदर्भात चर्चा करीत असतानांच अजय नाईक यांनी सोबत आणलेल्या शाईच्या बाटलीमधील शाई करेरा यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच उभे असलेले पाचोरा विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांनी अजय नाईक यांचा हात पकडून तो प्रयत्न हाणून पाडला.