भुसावळ । सांडपाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा, यासाठी पालिकेने सुमारे आठ महिन्यांपूर्वी बंब कॉलनीसमोरील रिंगरोडवरील नाल्याचे खोदकाम केले होते. मात्र अजूनही या ठिकाणचे काम पूर्ण होत नसल्यामुळे याठिकाणहून परिसरातील नागरिकांना ये- जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जामनेर रस्त्यालगत बंब कॉलनीकडे वळण घेताना लागूनच भला मोठा खड्डा खोदून पडलेला आहे.
पालिकेचे दुर्लक्ष
यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला होता. मात्र, आठ महिने होवूनही येथे चेंबर अथवा साधा ढापा ठेवण्याची तसदी पालिकेने घेतलेली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेने नालेसफाईचा घाट घातला आहे. शहराच्या दृष्टीने ही आवश्यक कामे असली तरी, रिंगरोडवरील नाल्याचे खोदकाम होवूनही तेथे चेंबर किंवा ढापा ठेवण्यामागील कोडे या भागातील रहिवाशांना उमगलेले नाही.
मोठा अपघात होण्याची शक्यता
रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे या खड्ड्यात पडून काही नागरिकांना इजा देखील झाली होती. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पावसाळ्यात या खड्डात पाणी तुंबून अपघात होऊ शकतो. शिवाय सांडपाणी रस्त्यावर वाहून डोकेदुखी वाढेल. तत्पूर्वी, पालिकेने आवश्यक दुरुस्तीच्या कामांना मुहुर्त काढावा.