धुळे – सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला अटी व शर्तीवर जामीन मिळाल्यानंतर त्याने तालुका पोलिस ठाण्यात हजेरी न लावल्याने त्यास अटक करण्याबाबत तपासाधिकार्यांनी आरोपीचा वर्तणूक अहवाल न्यायालयाला सादर केला होता. सरकार पक्षाने यात बाजू मांडल्याने आरोपीला अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यास मंगळवारी अटक करण्यात आली. संतोष किसन खताळ (रा.आंबोडेे, ता.जि धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
न्यायालयीन आदेश न पाळल्याने कारवाई
संतोष खताळ या आरोपीने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंबोडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल होवून त्यास अटक करण्यात आली होती. आरोपीस न्यायालयीन कोठडीत असताना अटी व शर्तींच्या आधारे जामीन मंजूर झाला होता तर आरोपीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात एक महिना हजेरी देणे बंधनकारक असताना त्याने न्यायालयाचे आदेश पाळले नसल्याने या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी आरोपीच्या वर्तनाबाबत न्यायालयात अहवाल सादर केला होता. या अहवालावर न्यायालयाने सरकारी पक्ष व आरोपी पक्ष या दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. न्यायालयाने आरोपीचा मंजूर केलेला जामीन रद्द करून त्यास अटक् करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी मंगळवारी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली. याकामी हेड कॉन्स्टेबल विलास पाटील यांनी मदत केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड.देवेंद्र तंवर यांनी बाजू मांडली.