नवी दिल्ली । मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी श्रीकांत पुरोहित याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी लेफ्टनंट कर्नल पुरोहितची तात्काळ सुनावणी करणे टाळले आहे. ठरलेल्या वेळेप्रमाणेच त्यांची सुनावणी होईल, असे खेहर यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटात कट रचल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला 25 एप्रिल रोजी जामीन दिला. परंतु, या प्रकरणातील सहआरोपी पुरोहित यांचा जामीन नाकारला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 मध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या स्फोटात 6 जण ठार झाले होते, तर 100 जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा आणि 44 वर्षीय पुरोहितला 2008 साली अटक करण्यात आली होती. साध्वी प्रज्ञा कर्करोगाने पीडित असून ती मध्यप्रदेशमधील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. तर पुरोहित हे महाराष्ट्रातील तळोजा या तुरुंगात कैद आहेत.