जामिया इस्लामिया इशातुल उलूम येथे स्वातंत्र्य दिवस साजरा

0

अक्कलकुवा । येथील जामिया इस्लामिया इशातूल उलूम मदरसा व मदरसा संचलित 10 शाळा व महाविद्यालयामार्फत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मदरसा व शाळा, महाविद्यालयातील एकूण 12 हजार विद्यार्थी व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन एक अद्भूत व भव्य कार्यक्रमाची नोंद केली. सदर कार्यक्रमाचा ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष हाफिज इस्हाक रंदेरा यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी अक्कलकुवा पो.नि.मेघश्याम डांगे, आमश्यादा पाडवी, मौलवी हुजेफा वस्तानवी, सुलेमान रंदेरा, प्राचार्य रफीक जहागिरदार, प्राचार्य अकबर पटेल, अखलाक शेख, प्र. प्राचार्य इरफान सय्यद, प्राचार्य साजिद शेख, प्राचार्य खान जावेद, प्राचार्य इलियास पटेल, प्राचार्य तारीक शेख उपस्थित होते. पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी कार्यक्रमातील शिस्तबद्ध विद्यार्थी व संस्थांची स्तुती केली. मौलवी हुजेफा वस्तानवी यांनी सांगितले की, मदरसातही विद्यार्थ्यांना देशभक्ती शिकविली जाते. तसेच मदरसाबाबत लोकांचे गैरसमज होत असल्याने आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही येथेच जन्मलो व मरणार आहोत. त्यामुळे ही भूमी आमची आहे व आमचीच राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी त्यावर प्रेम करावे.सूत्रसंचालन मौलाना अब्दुल रहिम फलाही यांनी केले. यशस्वीतेसाठी मौलवी जावेद, मौलवी हसीब, मौलवी नोमान, मौलवी याहया, मौलवी इमरान, मौलवी नजीर, हमीद खान, इमरान, जुनैद काजी, फिरोज मक्राणी आदींनी परिश्रम घेतले.