जामिया विद्यापीठ प्रकरण: पोलिसांवर गुन्हे दाखल करणार: कुलगुरू

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्ली, आसाममध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी आज सोमवारी अमानुष मारहाण केली. यावर विद्यापीठाच्या कुलगुरु नजमा अख्तर यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्ली पोलिसांवर एफआयआर दाखल करणार असल्याचे सांगत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

पोलिसांनी थेट ग्रंथालयात घुसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. याचे पुरावे आहेत. या घटनेमुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम झाला आहे असे आरोप कुलगुरूंनी केला आहे.

विद्यापीठातील या घटनेमध्ये एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही अफवा असून अशा गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. आमच्या मुलांना पोलीस काल त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. आमचा संपूर्ण कर्मचारी वर्ग त्यांना सुरक्षित पुन्हा विद्यापीठात आणण्यासाठी प्रयत्नशील होता. आमच्याकडे याबाबत माहिती देण्यासाठी वेळ नव्हता. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. त्यांची आपल्या पालकांसोबत बातचीत करुन देण्यात आली आहे. यामध्ये काही बाहेरचे विद्यार्थी देखील आहेत त्यांना देखील सोडवण्यात आले आहे असे कुलगुरूंनी सांगितले.