फसवणूक करणाराही खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी ; स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
जळगाव : ट्रक चालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आरोपीचा जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली उत्तरप्रदेशातील आरोपीच्या भावास चंद्रकांत गणपत सुरळकर (36, रा.टॉवर चौक, जळगाव) याने 1 लाख 35 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरळकर हा स्वत: खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असून जामीनावर असताना त्याने हा गुन्हा केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान सुरळकर याच्याकडे प्रमुख व जिल्हा सत्र न्या. गोविंद सानप यांच्या नावाचे आदेशही आढळून आले असून त्याच्याकडून पोलिसांनी ते जप्त केले आहे.
कारागृहात झाली ओळख
मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा शिवारात मोहम्मद सद्दाम हुसेन मोहम्मद (25,रा.प्रतापगढ, उत्तर प्रदेश) या ट्रक चालकाचा तेल चोरीसाठी दोघांनी ऑगस्ट महिन्यात खून केल्याचे उघड झाले. या खून नाट्यात सहभागी असलेल्या विशालसिंग अमरनाथसिंग राजपूत (रा.बिहटा, पो.पथी, ता.फुलपुर, जि.अजमगढ, उत्तर प्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातून अटक केली.विशालसिंग गुन्हा उघडकीस आल्यापासून कारागृहात आहे. त्याच काळात चंद्रकांत सुरळकर हा देखील शहर पोलीस स्टेशनच्या एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. तेथे विशालसिंग याच्याशी त्याची ओळख झाली. काही दिवसांनी सुरळकर याला जामीन मंजूर झाला. तेव्हा तुलाही जामीन मिळवून देतो असे सांगून त्याने विशालसिंगला सांगितले. त्यानुसार विशालसिंग याने त्याचा भाऊ सौरभसिंग याच्याशी संपर्क करुन देत पुढील व्यवहार सुरळकरशी करण्याबाबत सांगितले.
सुरळकरने स्वतःहून साधला संपर्क साधून अडकविले
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन च्या गुन्ह्यात विशालसिंग अमरनाथसिंग राजपुत हा आरोपी सध्या कारागृहात असुन त्याचे जामिना करीता त्याचा मोठा भाऊ सौरभ अमरनाथसिंग राजपुत यास नवरात्री दरम्यान जळगावहुन चंद्रकांत गणपत सुरळकर याने मोबाईल वरुन फोन केला. अॅड. देशपांडे या वकीलांकडे काम करीत असतो तुमचा भाऊ विशालसिंग यास जर जामिन करायाचा असेल तर आधी 50,000 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार सौरभ राजपूत याने 27 सप्टेगर रोजी 50 हजार रुपये दिले. यानंतर पुन्हा सुरळकरने मागणी केल्यानुसार सौरभने त्याच्या खात्यात 30 हजार रुपये जमा केले. यानंतर पुन्हा सौरभने जळगावात येवून सुरळकर यास 25 हजार रुपये दिले.
मारुन टाकण्याची दिली धमकी
जामीन मिळावा यासाठी सौरभ राजपुत हा जळगाव शहरातील विसावा लॉज मध्ये थांबलेला होता. यादरम्यान 12 नोव्हेंबर रोजी चंद्रकांत सुरळकर याने पुन्हा सालोन्सी करीता सौरभकडे 60,000 रुपयाची मागणी केली. व पैसे दिले नाही तर तुला लखनऊ जावू देणार नाही असे म्हणून मारुन टाकण्याची धमकी दिली. यावेळी सौरभने 60 हजार रुपयांपैक्ी 5 हजार रुपये सुरळकर यास दिले. फसवणूक होत असल्याची खात्री झाल्याने सौरभ याने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, स.फौ.अशोक महाजन, पोहेकॉ.रविंद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, दिपक पाटील, दादाभाऊ पाटील, विनोंद सं.पाटील, अनिल देशमुख, पल्लवी मोरे तसेच सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, दर्शन ढाकणे यांने पथकामार्फत चंद्रकांत गणपत सुरळकर वय – 36 रा.टॉवर चौक यास ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सौरभच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायाधीशांच्या नावाचे बनावट आदेश
पोलिसांनी चंद्रकात सुरळकर याला अटक करुन झडती घेतली असता त्याच्याकडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांच्या नावाचे बनावट जामीन आदेश आढळून आले आहेत. या आदेशावर सानप यांचे नाव असले तरी सही व शिक्का नाही. या आदेशाच्या प्रती पोलिसांनी जप्त केल्या आहेत.