जामीन विक्री प्रकरणी फसवणूक केल्या प्रकरणी बिल्डरला अटक

0

पिंपरी-बनावट सरकारी कागदपत्रांद्वारे एकच जमीन अनेकांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोन शेतक-यांसह दोन बिल्डरांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सोमवार २५ पर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.

याप्रकरणी संतलाल रोशनलाल यादव (वय 47,रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नथू चिंधू खिलारी (वय 55), खंडु चिंधू खिलारी (वय 52, रा.बोरज, मळवली, ता.वडगाव मावळ), बाबासाहेब तोलाजी चितळे (वय 47), भाऊसाहेब बाबुराव काळे (वय 45, रा. ज्योतीबानगर, काळेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, जितेंद्र रामदास तोरे (वय 45 रा.जळगाव) हे पसार झाले आहेत. या आरोपींवर भादंवि कलम 467 (सरकारी कागदपत्रांचे बनावटीकरण, कलम 468 (फसवणूक करण्यासाठी खोटी दस्ताऐवज तयार करणे), कलम 471 (बनावट दस्ताऐवज खरा म्हणून वापरणे), कलम 420 (फसवणूक करणे) नुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील ’साई डेव्हलपर्सचे संचालक बाबासाहेब चितळे, भाऊसाहेब काळे आणि जितेंद्र तोरे यांनी संतलाल यादव यांना बोरज-मळवली येथील तीन गुंठे जमीन देतो असे सांगून आठ लाख रुपये घेतले. वडगाव-मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यात आली. तथापि, दीड वर्षे त्यांनी जागेचा ताबा देण्याकामी चालढकल केली. या प्रकरणी चौकशी केली असता जागामालक नथु खिलारी, खंडु खिलारी आणि साई डेव्हलर्सच्या भागीदारांनी यापूर्वीच जागा विकल्याचे समोर आले. बनावट सात बारा, तलाठ्याचा खोटा शिक्का, सहीद्वारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींनी अनेकांची फसवणूक केली असून त्यापैकी सातजणांनी वाकड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.