मुंबई । अॅमेच्युअर सायकलिंग असोसिएशन ऑफ बॉम्बे सबर्बन डिस्ट्रिक्ट आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तर्फे 14 जानेवारीला जायंट स्टारकिन अशोक खळे स्मृती मुंबई ते खंडाळा या 80 किलोमीटर अंतराच्या खुल्या सायकलिंग शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत एलिट सायकलिस्ट आणि हायब्रीड सायकलिंग अशा दोन गटामध्ये रंगेल. खार-स्टारकिन येथून सुरुवात होणार्या या शर्यतीचा एस.व्ही रोड, वांद्रे, माहीम, शिवसेना भवन, टिळक ब्रिज, दादर टी टी , सायन, चेम्बुर हा न्यूट्रल झोन असेल. त्यानंतर चुनाभट्टी, चेंबूर, वाशी , पनवेल, खोपोली आणि भोर घाटाच्या शेवटी बोगदा संपल्यानंतर या शर्यतीचा शेवट होईल. या शर्यतीत समता नगर (पनवेल , शेड्यून्ग टोल नाका) ते भोर घाट असा एकच प्राईम असणार आहे.
दरवर्षी होणार स्पर्धा
घाटांचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्या अशोक खळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई पुणे सायकल शर्यतीत अशोक खळे यांनी दोनदा घाटांचा राजा पुरस्कार जिंकला होता. याशिवाय हैद्राबाद येथे झालेले राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावले होते. स्पर्धात्मक सायकलिंग मधून निवृत्त झाल्यावरही अशोक खळे यांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकलिंगचा सराव सुरु ठेवला होता. सराव करत असतानाच खळे याना 7 नोव्हेंबर रोजी गंभीर अपघात झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान 11 नोव्हेम्बर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
विजेत्यांना चषक व रोख रक्कम
स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे एक लाख 10 हजार रुपयांची रोख बक्षिसे आणि फिरता चषक देऊन गौरण्यात येणार आहे. एलिट गटातील विजेत्याला 30 हजार आणि हायब्रीड गटातील विजेत्याला 15 हजार रुपयांचा पुरस्कार मिळेल. स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी अॅमेच्युअर सायकलिंग असोसिएशन ऑफ बॉम्बे सबर्बन डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष गजेन गानला (9820490100), सचिव डॉ. अमोल गानला (9820154100 ), जेसन रॉड्रिक्स (9881518220) किंवा अमित जांडूळकर (977343694 ) यांच्याशी संपर्क साधावा.