जायबंदी मिचेल मार्शऐवजी स्टॉयनिस

0

बगळुरू । बगळुरूच्या दुसर्‍या कसोटीतील डिआरएस प्रकरणातून अजून कंगारू बाहेर येतांना दिसत नसतांना त्यांना दुसरा व मोठा झटका बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श भारताविरुद्धच्या मालिकेतील पुढील दोन कसोटींना मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे फिजिओ डेव्हिड बेकली म्हणाले, ‘मार्श खांद्याच्या दुखण्याने आधीपासूनच त्रस्त होता.

दुखापत फार गंभीर नसल्याने तो सुरुवातीच्या पूर्ण मोसमात खेळला; पण आता त्याला हे दुखणे असह्य झाले आहे. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मायदेशी परत पाठविण्यात येणार आहे’.दरम्यान मिचेल मार्शऐवजी मार्कस स्टॉयनिसची निवड करण्यात आली आहे. मिचेल मार्शने बेंगळुरू कसोटीत पाच षटके टाकली, तर फलंदाजीत त्याला 0 आणि 13 धावाच करता आल्या. पुणे कसोटीत त्याने 4 आणि 31 धावा केल्या होत्या. सध्या चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरी कसोटी 16 ते 20 मार्चदरम्यान रांची येथे आणि चौथी कसोटी 25 ते 29 मार्चदरम्यान धरमशाला येथे खेळली जाणार आहे.