नवी दिल्ली । प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जालना जिल्ह्याला राष्ट्रीय सन्मान प्रधानमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना ‘प्रधानमंत्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री ग्राम सिंचन योजना’,‘दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना’, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’,‘स्टँडअप इंडिया’-‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक नॅशनल ग्रीकल्चर मार्केट’ या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या जिल्हाधिका-यांना विविध श्रेणींमधे पुरस्कार देऊन या कार्यक्रमात गौरविण्यात आले.
शेतकर्यांचा 39 कोटी रूपयांचा विमा हप्ता भरून पिक विमा योजनेत सहभाग
जालना जिल्ह्यात 2015-16 या वर्षात खरीप हंगामात शेतक-यांनी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनें’अंतर्गत एकूण 25 कोटी विमा हप्ता भरला आणि जिल्हयातील पीक विमा घेतलेल्या 95 टक्के शेतक-यांना 431 कोटी 64 लाख रूपये नुकसान भरपाई मिळाली. याच वर्षात रब्बी हंगामात शेतक-यांनी 2 कोटींचा विमा हप्ता भरला आणि त्यांना 44 कोटी 29 लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळाली. वर्ष 2016-17 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून खरीपात 4 लाख 69 हजार आणि रब्बी मध्ये 1 लाख 27 हजार शेतक-यांनी 39 कोटी रूपयांचा विमा हप्ता भरून पिक विमा योजनेत भाग घेतला.
‘नागरी सेवा दिनी’ पुरस्कार प्रदान
राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण काम करणार्या नागरी सेवेतील अधिकार्यांना दरवर्षी 21 एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिनी’ ‘प्रधानमंत्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. येथील विज्ञानभवनात प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015-16 साठी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले. प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाचे राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री यांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा, कॅबीनेट सचिव पी.के.सिन्हा यावेळी उपस्थित होते.