जालना जिल्ह्यात गोठ्याला आग; ३ चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

0

जालना : भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर गावात जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये तीन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत संजीवनी गजानन मवहारे (४), वेदांत विष्णू मवहारे (७) आणि सार्थक मारुती कोलते (५) या तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, क्षीरसागर गावालगतच विष्णू कोलते यांचा गोठा आहे. या गोठ्यात ते जनावरांसाठी चारा साठवून ठेवायचे. मात्र या चाऱ्याला आज अचानक आग लागली. या दरम्यान ही तिन्ही मुले गोठ्यामध्ये खेळत होती. अचानक लागलेली आग वाऱ्यामुळे अधिक पसरत गेली. चिमुरड्यांनी आपला जीव वाचावा याकरता आरडाओरड देखील केली. आगीची घटना कळताच गावकरी मदतीसाठी धावून आले. तसेच त्यांनी खासगी टँकर बोलावून आग देखील विझवली. मात्र तोपर्यंत तिन्ही मुलांनी जागेवरच प्राण सोडला होता. या तिन्ही मुलांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अचानक या घडलेल्या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.