हिंगोली/परभणी : जालना आणि परभणी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाले. मृतांत एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील खुडज येथून शेख गुलाब शेख कासम शेख हे मुलगी शेख शन्नो शेख रफिक (25) हिला औरंगाबाद येथील रुग्णालयात कारने (एमएच-26 एके 3064) घेऊन जात होते. त्यांच्यासोबत शन्नोचा दोन वर्षीय मुलगा समीरही होता. गुलाब यांची पत्नी शेख साजनबी, सलमान सरदार पठाण आणि कार चालक दत्ता त्रिमुख टाले हे सुद्धा होते. मंठा ते औरंगाबाद रस्त्यावर जालन्याच्या झीरो फाट्यावर रात्री त्यांच्या कारला टँकरने जोराची धडक दिली. त्यात शेख गुलाब, त्यांची मुलगी शन्नो आणि नातू समीर जागीच ठार झाले तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसरा अपघात परभणी जिल्ह्यात घडला. गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव तांड्यावरील दत्ता सीताराम राठोड (23) व पंडित संदीप बनबरे (20) हे मोटारसायकलने (एम.एच.09 डी.के.9085) प्रवास करत असताना गुरुवारी सकाळी आठ वाजता पडेगाव पाटीजवळ (जि. परभणी) बसची (एम.एच.20 बी.एल. 74) समोरासमोर धडक झाली. यात दत्ता व संदीप यांचा मृत्यू झाला. ते दोघेही पुण्याला कामाला होते.