जालन्याची पाणीयोजना पूर्णत्वाकडे

0

जालना । महाराष्ट्रातील पहिली पायलट परतूर, मंठा व जालना तालुक्यात समाविष्ट 176 गावांसाठीची ग्रीड पद्धतीची पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत वेगात सुरु असून या योजनेची स्थापत्य कामे 55 टक्के पूर्ण झाली असून लवकरच यांत्रिकी सह विद्युत कामांना सुरुवात होणार असून 1 वर्षात ही योजना कार्यान्वित करणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी दिली. या योजनेची अधीक्षक अभियंता मजीप्रा गुणवत्ता पथक ठाणे यांचेकडून तांत्रिक तपासणीला उद्या पासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी या पथका सोबत आज पालकमंत्री बबणराव लोणीकर यांनी आज योजनेच्या कामास भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते.

पाणी प्रश्‍न सुटणार
या योजनेबाबत बोलताना श्री.लोणीकर म्हणाले की, या योजनेत समाविष्ट असलेल्या 176 गावांपैकी 124 गावांना पूर्वी टँकर, विहीर अधिग्रहणद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे या गावांचा पिण्याचे पाण्याचा कायमचा प्रश्‍न सोडविण्याकरीता 176 गावांची ग्रीड पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत विशेष मंजूर करून घेण्यात आली आहे. या योजनेची किंमत रु. 234. 41 कोटी इतकी असून या योजनेची स्थापत्य कामे मे. आर. ए .घुले ,पालघर हे करीत असून या योजनेच्या स्थापत्य कामांना जानेवारी 2017 ला सुरुवात झाली आहे.

कामांची पाहाणी
या पथकाच्या तांत्रिक तपासणीच्या आधी पालकमंत्री यांनी या पथका सोबत योजनेच्या मापेगाव बु. येथील निम्न दुधना धरणात सुरु असलेल्या जॅक वेल, जोडकालवा व जोडपूल तसेच रोहिना बु. जवळील जलशुद्धीकरण केंद्र या कामांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी मजीप्राचे मुख्य अभियंता लोलापोड, श्रीमती पलांडे अधीक्षक अभियंता (गुणवत्ता पथक), शिंगरू अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) कार्यकारी अभियंता अजय सिंग, भालेराव (गुणवत्ता पथक), डाकोरे (जिप ग्रामीण पाणी पुरवठा जालना)उपअभियंता म्हात्रे ,कानडे व पाथरवट ,बागडे (यांत्रिकी), रमेश भापकर, हरीराम माने, विलासभाऊ आकात, दिगंबर मुजमुले, संपत टकले, सुरेशराव सोळंके, रमेश राव केवारे, रामदास घोंगडे, दत्तराव रायकर, सुधाकर बेरगुडे व अनेक गावांचे ग्रामस्थ, संबंधित कंत्राटदार, प्रतिनिधी उपस्थित होते.

गावे टंचाईमुक्त होणार
ही योजना डिसेम्बर 2018 पर्यंत कार्यान्वित होईल असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे नियोजन करण्यात आले असून या योजनेच्या पुर्णत्वानंतर हि गावे टंचाईमुक्त होणार असून या सर्व गावांना मुबलक व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे शक्य होणार असून या गावांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली निघेल त्यामुळे टंचाईग्रस्त कालावधी मध्ये कराव्या लागणार्‍या विविध उपाययोजनांच्या खर्चात शासनाची फार मोठी बचत होईल, अशी आशा पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी योजेनच्या कार्यक्षेत्रातील येणार्‍या गावांचे ग्रामस्थ व प्रतिनिधी उपस्थित होते.