अमृतसर : अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने याठिकाणी या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त डोमिनिक एसक्विथ यांनीही याठिकाणी हजेरी लावली आणि शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी डोमिनिक एसक्विथ यांनी येथील अभिप्राय नोंदवहीत एक संदेश लिहिला आहे.
डोमिनिक एसक्विथ यांनी अभिप्राय नोंदवहीत लिहिले आहे की, ‘जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. ब्रिटिश आणि भारतीय इतिहासातील सर्वात खेदजनक घटना आहे. जे झाले, त्याच्यासाठी आम्ही दु:खी आहोत. मला आशा आहे की, 21 व्या शतकात भारत आणि ब्रिटन यांच्यातील सहकार्य कायम राहिल याबद्दल आम्ही प्रतिबद्ध आहोत’. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ब्रिटिश पंतप्रधान तेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला होता.