जालियानवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्ष पूर्ण; राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली !

0

अमृतसर:ब्रिटिशांच्या राजवटीतील भारताच्या इतिहासातील एक दुःखद घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त डोमिनिक एसक्विथ यांनी अमृतसर येथील जालियनवाला बागमधील स्मारकाला भेट दिली आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅफ्टन अमरिंदर सिंग आदींनी उपस्थित राहत श्रद्धाजली वाहिली. यावेळी विशेष नाणे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले.

अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे १३ एप्रिल १९१९ रोजी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते. दरम्यान, ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने या बागेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या शस्त्रधारी सैनिकांना तैनात करीत घेराबंदी केली होती. त्यानंतर त्याने कुठलाही इशारा न देता आपल्या सैन्याला लोकांवर १० मिनिटे गोळीबार करण्याचे आदेश दिले. या घटनेत १००० लोकांचा मृत्यू झाला होता. तर १५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. मात्र, ब्रिटश सरकार यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या केवळ ३७९ इतकी तर जखमींची संख्या १२०० इतकी होती असे सांगत होते.