धुळे । खरीप हंगाम सन 2018 च्या अनुषंगाने पीक कर्ज वाटप करण्यासाठी सर्व बँकांनी प्रशासनाच्या मदतीने पीक कर्ज मेळावे घेऊन जास्तीत जास्त शेतकर्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, असे निर्देश मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिले आहेत.
गहाणखताची मागणी करू नये
यामध्ये प्रामुख्याने 30 जून 2018 अखेर सर्व बँकांनी (व्यापारी/राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांनी खरीप हंगाम 2018 साठी दिलेल्या लक्ष्यांकाच्या 50 टक्के पीक कर्ज वाटप करावे. पीक कर्ज वाटप करतांना नवीन शेतकर्यांना रुपये एक लाखांपेक्षा जास्त कर्ज वाटपासाठी नोंदणीकृत गहाण खतासाठी आवश्यक असणारे सर्च रिपोर्टसाठी संबंधित वकिलांनी/बँकांनी एक हजारांपेक्षा जास्त शुल्क घेता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत लाभ शेतकर्यांना तत्काळ नवीन पीक कर्जाचे वाटप करावे. शेतकर्यांनी एक लाखापेक्षा जास्त पीक कर्जासाठी बँकेस नोंदणीकृत गहाणखत करुन दिलेले असल्यामुळे पुढील पाच वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचे नवीन सर्च रिपोर्ट अथवा गहाणखताची मागणी करू नये. ही तरतूद कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्यांना देखील लागू राहील. एक लाखापेक्षा कमी कर्ज वाटपासाठी कोणत्याही बँकेने नोंदणीकृत गहाणखताची मागणी करू नये. कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्यांच्या याद्या सर्व बँकांनी सर्व शाखा स्तरावर नोटीस बोर्डावर प्रसिध्द कराव्यात. पीक कर्ज मंजूर करताना बँकांनी शेतकर्यांकडून इतर बँकाचा ना-हरकत दाखला मागू नये. तर बँकांनी वरील सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा पिक कर्ज वाटपात दिरंगाई केल्यास याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे आदेश अपर जिल्हाधिकारी, धुळे यांनी दिल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.