पिंपरी-चिंचवड : कंपनीत गुंतवणूक केल्यास रक्केमवर रोज 2 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांची साडे आठ लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मोशी येथे नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजेश कापडे (वय 49, रा. मोशी, प्राधिकरण) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अतुन भौमिक व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सेनोबीया कमोडीटी सर्व्हिस प्रा. लि. या कंपनीत गुंतवणूक केल्यास रक्केमवर रोज 2 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार कापडे यांनी 11 एप्रिल ते जुलै 2017 या कालावधीत सात लाख 26 हजार 132 रूपये गुंतविले. कापडे यांनी आपले मित्र प्रताप कारभारी यांनाही दीड लाख रूपयांची गुंतवणुक करण्यास सांगितले. आरोपींनी फिर्यादीला व्याज व मुळ रक्कम परत न करता फक्त 23 हजार 292 रूपये दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.