कठोर कायदे करण्याची गरज : व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली : टीव्ही, वर्तमानपत्र आणि ऑनलाईन जाहिरातींमधून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार अलिकडे मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. यासंदर्भात तक्रार केली तरी दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांची कुचंबना होते. शिवाय, अशा फसव्या जाहिराती प्रसिद्ध करण्यावर सरकारचे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांची उघडपणे लूट सुरू आहे. अशाच प्रकारचा अनुभव दस्तुरखुद्द देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही आला असून, त्यांनी तो राज्यसभेत सांगितला. उपराष्ट्रपतींची अशाप्रकारे फसवणूक होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्नच यानिमित्ताने पडला आहे.
1 हजार रूपयांना फसवले
नायडू म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी टीव्हीवर वजन कमी करण्याच्या प्रॉडक्टची एक जाहिरात पाहिली. या जाहिरातीत असा दावा करण्यात आला होता की गोळ्या घेऊन एका विशिष्ट कालावधीत वजन कमी करण्यास मदत होते. ही जाहिरात पाहून मी या गोळ्या मागवल्या, त्यासाठी 1 हजार रुपयेही भरले. मात्र या गोळ्या मला पाठवण्यात आल्याच नाहीत. गोळ्या येण्याऐवजी त्याजागी फक्त एक इमेल आला ज्यामध्ये लिहिण्यात आले होते की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दुसर्या प्रकारच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, ज्यासाठी तुम्हाला आणखी एक हजार रूपये भरावे लागतील. या गोळ्यांचे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला त्या पाठवल्या जाणार नाहीत. या सगळ्या अनुभवामुळे मी समजून चुकलो की मी पाहिलेल्या जाहिरातीला काहीही अर्थ नव्हता. ती तद्दन खोटी जाहिरात होती असेही नायडू यांनी राज्यसभेत सांगितले.
फसवणार्यांविरूद्ध कठोर कायदे करा
आयुर्वेदिक औषध, गोळ्या, वर्कफ्रॉम होम अशा विविध प्रकारच्या जाहिराती आपण टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रात वाचत असतो. या फसव्या जाहिरातींमुळे असंख्य नागरिकांचे दररोज नुकसान होत असते. अनेकांच्या आरोग्यासंबंधीच्या तक्रारी अधिकच वाढतात. आता तर खुद्द उपराष्ट्रपतींचीही फसवणूक झाल्याचे समोर आल्याने अशाप्रकारच्या फसवणुकीवर लवकरच निर्बंध आणणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी त्यांना आलेल्या ई-मेलबाबत आणि या सगळ्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना माहिती दिली. त्यांनी यासाठी चौकशी समिती नेमली, चौकशीत समजले की उपराष्ट्रपतींची फसवणूक झाली आहे. त्याचवेळी नायडू यांनी पासवान यांना सांगितले की, अशा खोट्या जाहिराती देणार्यांविरोधात कठोर कायदे करा जेणेकरून सामान्य माणसाची फसवणूक होणार नाही.