जाहिरातबाजांवर गुन्हे दाखल करा

0

पुणे । शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत जाहीरातबाजांवर आता सरसकट गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. अनधिकृत फ्लेक्स तसेच बोर्ड, बॅनरवर करण्यात येणार्‍या कारवाईचा आढावा घेण्यासाठी मुक्ता टिळक यांनी ही बैठक बोलाविली होती. या बैठकीत अनधिकृत जाहीरातबाजीमुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतच्या सूचना महापालिकेच्या आकाशचिन्ह
आणि परवाना निरिक्षकांना देण्यात आल्या आहेत.

शहरात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहीरातबाजी सुरू आहे. शहराचे प्रमुख चौक, महापालिकेने वेगवेगळया उपक्रमांतर्गत सजविलेल्या भिंती, बस थांबे, पथ दिवे, शहरातील झाडे, पदपथांवर मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या जाहीराती करण्यात येतात. अशा जाहीराती महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या कारवाई अंतर्गत काढण्यात येत असल्या तरी, संबधित जाहीरातदारांवर काहीच कारवाई होत नसल्याने त्याच ठिकाणी पुन्हा जाहीराती लागतात. त्यामुळे या जाहीराती काढण्यासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तसेच निधी खर्च करावा लागतो.प्रत्यक्षात महापालिकेची मान्यता घेऊन त्यासाठी निश्‍चित केलेले ठराविक शुल्क भरून या जाहीराती करणे अपेक्षीत असते. मात्र, राजकीय दबाव आणून या अनधिकृत जाहीराती लावल्या जातात. तसेच त्यावरील कारवाईही थांबविली जाते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण होत आहे. जाहीरातदारांना चाप लावण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वर्षभरात 12 गुन्हे दाखल
यापूर्वीही न्यायालयाने अनेकदा अशा जाहीरातदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिकेस दिले आहेत. तसेच त्यासाठी महापालिका आणि पोलिसांचे नामनिर्देशीत अधिकारी निश्‍चित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारीही निश्‍चित केलेली आहे. मात्र, संबधित दाव्याची सुनावणी सुरू असे पर्यंतच पालिकेकडून आणि पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यामुळे वर्षभरात असे अवघे 10 ते 12 गुन्हे दाखल होतात. त्यानंतर पुढे काहीच कारवाई होताना दिसत नाही. मात्र, यावेळी जाहिरात फलकावर असलेली नावे, फोटो असणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून भिंती, बसथांबे तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि इतर ठिकाणी चिटकविलेल्या जाहीरातींवरील संपर्क क्रमांकाची माहिती घेऊन संबधितावर शहर विद्रूपीकरणाचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

वर्षाला दोन लाख गुन्हे ?
महापालिका आयुक्त तसेच महापौरांनी याबाबतचे आदेश दिलेले असले तरी, त्याची अंमलबजावणी किती होणार याबाबत साशंकता आहे. पालिका प्रशासनाकडे असलेल्या आकडेवारीनुसार, आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून प्रत्येक वर्षाला सुमारे दिड लाख बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, झेंडे, तसेच जाहीरात फलकांवर कारवाई होती. या शिवाय, भिंती, स्वच्छतागृहे, बसस्थानके, सार्वजनिक मिळकतींच्या भिंती तसेच शहरातील झाडांवर चिकटविण्यात आलेल्या तसेच खिळे ठोकून लावण्यात आलेल्या जाहीरातींसाठी आकडेवारी सुमारे 50 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे पालिका वर्षाला 2 लाख गुन्हे दाखल करणार का आणि पोलिस ते दाखल करून घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.