नवी दिल्ली । काही जाहिराती आपल्यावर एक वेगळीच छाप पाडून जातात. त्यांच्या सादरीकरणात इतका प्रभाव असतो की, उत्पादनाकडे फारसे लक्ष जात नाही किंवा अनेकदा असे होते त्या सादरीकरणामुळे उत्पादन चांगले लक्षात राहते. व्होडाफोन इंटरनेट जाहिरात त्यातलीच एक. या जाहिरातीतले आजी-आजोबा पहिल्यांदाच घरापासून लांब फिरायला जातात आणि सुरू होते जाहिरांतीची मालिका. गेल्या 35 वर्षांत कधीही मज्जा मस्ती करायला घराबाहेर न पडणारे आजी-आजोबा या सहलीत तरूण होऊन जातात. जबाबदारी पार पाडताना आयुष्य सरले पण गोव्यात आल्यानंतर मात्र दोघेही आपल्या आयुष्याचा मनमुराद आनंद लुटतात. दिल चाहता है या चित्रपटात दाखवलेला किल्ला बाईकवरून शोधायचा असो, टॅटू काढून घेणं असो किंवा बीच पार्टीमध्ये डान्स करणे असो. हे आजी आजोबा एकूण एक गोष्ट एन्जॉय करतात म्हणूनच सगळ्यांना ते दोघंही फार आवडले होते आणि ही जाहिरात एक वेगळीच जादू निर्माण करतात.
बालपणापासून एकत्र नृत्य
जाहिरातीतल्या दोन भागांसाठी या दाम्पत्यांनी खूप मेहनत घेतली. यासाठी व्हीपी धनंजयन हे स्कूटर चालवायला शिकले, तर शांता यांनी पॅरासेलिंगचे धडे घेतले. या दोघांनीही सत्तरी केव्हाच पार केली आहे. याबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची तर व्हीपी आणि शांता हे दोघंही बालपणापासूनच एकत्र नृत्याचे धडे घेत आहेत. जेव्हा शांता पहिल्यांदा व्हीपी यांना भेटल्या होत्या तेव्हा त्या आठ वर्षांच्या होत्या तर व्हीपी हे बारा वर्षांचे होते.
आयुष्यातही एकमेकांचे साथीदार
जाहिरातीत पती पत्नी म्हणून काम करणारे हे जोडपे खर्या आयुष्यातही नवरा बायको आहेत. व्ही.पी. धनंजयन आणि शांता धनंजयन अशी त्यांची खरी ओळख. पण, त्यांच्याबद्दल एवढीच ओळख करून देणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. नृत्य क्षेत्रात धनंजयन दाम्पत्यांचे नाव खूपच आदराने घेतले जाते. हे दोघेही भरतनाट्यम विशारद आहेत. हे दाम्पत्य स्वत: विद्यार्थ्यांना भरतनाट्यम शिकवतात. 2009 मध्ये या दाम्पत्याला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.