जाहिरात फलकांच्या उंचीवर पालिकेने घातली बंधने

0

40 फुटांपेक्षा जास्त उंच फलकांना मनाई

पुणे : महापालिकेची मान्यता घेऊन मनमानी पद्धतीने रस्त्याच्या कडेने कितीही उंचीचे जाहिरात फलक आता लावता येणार नाहीत. रस्त्याकडेला असलेल्या जाहिरात फलकांची उंची यापुढे जमिनीपासून 40 फूट ठेवण्यात येणार आहे. हा नियम उड्डाणपुलाबाजूला असलेल्या जाहिरात फलकांनाही लागू असणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

मागील महिन्यात मंगळवारपेठ येथील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जणांना जीव गमवावा लागला. या होर्डिंगची उंची 80 फुटांपेक्षा अधिक होती. त्यामुळे भविष्यात होणार्‍या अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या होर्डिंगच्या भविष्यात होणार्‍या अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पालिका प्रशासनाने पुणे आऊटडोर असोसिएशनसह जाहिरात प्रतिनिधींची बैठक घेतली होती. यात जाहिरात व फलक नियंत्रण नियम 2003 चे उल्लंघन करत असतील, ते जाहिरात फलक नियमानुसार करून घेण्याबाबतचे आदेश देण्यात आले.

असे आहेत नवीन उंचीचे नियम

बैठकीतील सूचनेनुसार, सर्व अधिकृत व मान्यताप्राप्त होर्डिंगची उंची रस्त्याच्या बाजूला असल्यास रस्त्यापासून 40 फूट उंच व इमारतीच्या गच्चीवर असल्यास गच्चीपासून 40 फुटांपेक्षा अधिक उंच नसावेत. या जाहिरात होर्डिंग रस्त्यापासून दीड मीटर आतमध्ये असावेत, होर्डिंगचा कोणताही भाग या अंतराच्या आतमध्ये येऊ नये या प्रमुख सूचना आहेत. त्यामुळे शहरातील अनेक होर्डिंगची उंची कमी होणार असून रस्त्यापासून आतमध्ये ते सुरक्षित अंतरावर असणार आहेत. तसेच या नियमानुसार, संबंधित जाहिरात मालकांनी जाहिरात फलकाची रचना केलेली नसल्यास असे फलक महापालिकेकडून तातडीने काढून टाकले जाणार आहेत.

उड्डाणपूल परिसरातही हाच नियम लागू

उड्डाणपूल परिसरातील होर्डिंगलाही महापालिकेने हाच नियम लागू केला आहे. पुलाबाजूच्या जागेत हे फलक उभारताना पुलाच्या उंचीपेक्षा कितीतरी अधिक उंचीवर उभारले जातात. त्यामुळे आकाशचिन्ह नियमवालीचा भंग होतो. त्यामुळे या ठिकाणी असलेले होर्डिंगही जमिनीपासून 40 फूट उंच ठेवणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने पुलाजवळील होर्डिंगची उंची कमी केली जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.