जाहिरात फलकांबाबतची शुल्कवाढ अन्यायकारक

0

पुणे । शहरातील विविध भागातील रस्त्यांवर लावल्या जाणार्‍या जाहिरात फलकांसाठी मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही शुल्कवाढ व्यावसायिकांवर अन्यायकारक असून यामुळे अधिकृत परवानगी घेऊन जाहिरात फलक लावणार्‍यांचे मोठे नुकसान होणार असल्याची तक्रार पुणे आउटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

रस्त्यांवर लावल्या जाणार्‍या जाहिरात फलकांना पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे शुल्क भरावे लागते. काही वर्षांपूर्वी जाहिरात फलकांसाठी आकाशचिन्ह शुल्क म्हणून प्रकाशित जाहिरात फलकांसाठी प्रतिचौरसफूट 82 रुपये 65 पैसे इतकी तर अप्रकाशित फलकांसाठी 42 रुपये निश्‍चित करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत पालिकेने 222 रुपये प्रतिचौरस फूट या दराने शुल्क घेण्यास सुरुवात केली आहे. हे शुल्क अनेक छोट्या व्यावसायिकांना परवडत नाही. 40 बाय 20 या आकारातील जाहिरात फलकांसाठी व्यावसायिकांना वर्षाला 1 लाख 77 हजार 600 रुपये शुल्क भरावे लागत आहे. या शुल्कातही लवकरच बदल करून त्यात वाढ करण्याचा प्रयत्न पालिकेच्या वतीने केला जाणार असल्याचे समजले आहे. जाहिरात फलकांसाठी पालिकेने शहरात ‘अ’ आणि ‘ब’ असे गट तयार केले आहेत. अ गटातील जाहिरात फलकासाठी 500 रुपये प्रतिचौरस फूट तर ब गटासाठी 450 रुपये प्रतिचौरस फूट निश्‍चित करण्यात आल्याचे समजते. या शुल्कवाढीमुळे होर्डिंग व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार असून त्याला वर्षाला तब्बल 4 लाख रुपये आकाशचिन्हाचे भरावे लागणार आहे. ही शु्ल्कवाढ अन्यायकारक आहे, अशी तक्रार असोसिएशनचे पुणे शहर अध्यक्ष बाळासाहेब गांजवे यांनी केली.

नियमाप्रमाणे आकाशचिन्हाचे शुल्क भरून अधिकृत होर्डिंग लावणार्‍यांवरच अन्याय करून पालिका व्यावसायिकांना वेठीस धरत आहे. अनेक व्यावसायिक चुकीच्या पद्धतीने कोणतीही परवानगी न घेता होर्डिंग लावून पालिकेचा लाखो रुपये बुडविण्याचे काम करत असताना त्यांच्यावर कारवाई न करता आकाशचिन्हाचे शुल्क भरणार्‍यांवर अन्याय का, असा प्रश्‍नही गांजवे यांनी विचारला आहे.