मुंबई । सिडनी 2000 ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी झाली नाही. पण, या ऑलिम्पिकमुळे आपण खेळांच्या या जागतिक कुंभमेळ्यात सुवर्णपदक जिंकू शकतो असा आत्मविश्वास मिळाल्याचे बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीतील एआर रायफल प्रकारात पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणार्या अभिनव बिंद्राने सांगितले. अभिनव म्हणाला की, सिडनी ऑलिम्पिकच्या वेळीस 17 वर्षांचा होतो. त्यानंतर आठ वर्षांनी बीजिंगमध्ये देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. वेगवेगळ्या पाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले, पण सिडनी ऑलिम्पिक कायम स्मरणात राहिल.
टुरिझम ऑस्ट्रेलिया आणि टूरिझम अँड इव्हेंटस् क्वीन्सलॅडने गोलकोस्टमध्ये 2018 मध्ये होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची घोषणा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अभिनव बिंद्राने मनोगत व्यक्त केले. सिडनी ऑलिम्पिकच्या आठवणी जागवताना अभिनव म्हणाला की, त्या ऑलिम्पिकमध्ये 10 वे कि 11 वे स्थान मिळाले.
सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेचा आनंद लुटला तो तेथील नागरिकांमुळे. 10 मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेत वर्चस्व गाजवणारा अभिनव भारताचा एकमेव वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे. इतर स्पर्धांच्या जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे वेगळे महत्व असल्याचे बिंद्राने यावेळी स्पष्ट केले. भारतीय खेळाडूंच्या कारकिर्दीत राष्ट्रकुल स्पर्धांचा वेगळा मापदंड आहे राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होतात. तेव्हा प्रत्येक स्पर्धा ही ऑलिम्पिक स्पर्धेची पुर्वतयारी असते. प्रत्येक स्पर्धेचा दर्जा वेगवेगळा असला तरी सगळ्या स्पर्धा महत्वाच्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत एकुण नऊ पदके जिंकली, पण या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक 2014 मधील ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये जिंकले होते. असे अभिनव म्हणाला.