जिंकल्यास दुसर्‍यांदा अंतिम फेरीत खेळणार

0

डर्बी। आयसीसी महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्टेे्रलिया यांच्यात सामना रंगणार आहे. डर्बी काऊंटीच्या मैदानावर खेळल्या जाणार्‍या या सामन्यात सहावेळा ही स्पर्धा जिंकणार्‍या ऑस्टेे्रलियाला हरवून दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठण्याच्या इर्‍याद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. उभय देशांमध्ये आतापर्यत खेळलेल्या सामन्यांवर नजर टाकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कामगिरी फारशी चांगली नाही. कांगारुंविरुद्ध खेळलेल्या 42 सामन्यांपैकी 34 सामने भारताने गमावले आहेत. मिताली ताजच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ या पराभवांची परतफेड करण्यासाठी उत्सुक असतील. भारताने 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. साखळी लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाने सात पैकी सहा सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले होते.

सर्वोत्तम कामगिरी करू
न्यूझीलंडवर मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्‍वास चांगलाच वाढला आहे. कर्णधार मिताली म्हणाली की, ऑस्ट्रेलियाचा संघ चांगला आहे. त्यांच्याकडे चांगल्या फलंदाजांची फळी आहे आणि गोलंदाजीही चांगली आहे. त्यांना हरवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करू.

डर्बीचे मैदान भारतासाठी लकी
दुसर्‍या उपांत्य फेरीचा हा सामना डर्बीतील काऊंटी मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावर भारताने साखळी लढतीतील न्यूझीलंडविरुद्धच्या करो या मरो या सामन्यासह एकूण चार सामने खेळले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने या मैदानावर अद्याप एकही सामना खेळलेला नाही. पण त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी झाली आहे. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज म्हणाली की, डर्बीचे हे मैदान आमच्यासाठी घरच्या मैदानासारखे झाले आहे. या ठिकाणी खेळलेल्या चार सामन्यांमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. उपांत्य फेरीच्या या लढतीमुळे साखळी लढतीत ऑस्ट्रेलियाकडून 8 विकेट्सनी मिळालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे.

संघ यातून निवडणार
भारत – मिताली राज (कर्णधार), एकता बिष्ट, राजेश्‍वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मंधाना, मोना मेश्राम, शिखा पांडे, पूनम यादव, नजहत परवीन, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा, स्मृती मंधाना.

ऑस्ट्रेलिया – मेग लिनींग (कर्णधार), सारा अ‍ॅले, क्रिस्टीन बिम्स, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, निकोल बोल्टन, अ‍ॅशले गार्डनर, रशेल हँस, एलिसा हिली, जेस जोनासेन, बेथ मूनी, एलिसे पेरी, मेगान शट, बेलिंडा वेकारेव्हा, एलिसे विलानी, अमांडा जेड वेलिग्टंन.