जिंदगी जित गयी, कोरोना हार गया… पहिला पॉझिटीव्ह रुग्ण ‘कोरोना’मुक्त होवून घरी परतला…

0

डॉक्टरांसह कर्मचार्‍यांनी टाळ्या वाजवून केला आनंद व्यक्त

जळगाव– जिल्ह्यात जळगाव शहरातील मेहरुण येथील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यापासून या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरु होते. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचादरम्यान संबंधित रुग्णांचे 14 दिवसानंतर व 15 दिवसानंतर दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने तब्बल 17 दिवसांनंतर या रुग्णाला बुधवारी डिचार्ज देवून घरी सोडण्यात आले. पहिला पॉझिटीव्ह रुग्ण उपचारात बरा झाल्याने रुग्णांचा चेहर्‍यावर आनंद होताच, मात्र त्याला बरे करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले कोरोना संसर्ग वार्डात काम करणारे पारिचारिका, डॉक्टर यांच्याही चेहर्‍यावरुन आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांतर्फे टाळ्या वाजवून संबंधित पॉझिटीव्ही बरे झाल्याबाबत आनंद व्यक्त करण्यात आला. यानंतर डिचार्ज पेपर देवून, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णाला घरी सोडण्यात आले.

17 दिवसात रुग्ण बरा

मुंबई येथे पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात हा रुग्ण आला होता. यानंतर घरी परतल्यानंतर त्याला कोरोना सदृश्य लक्षणे सुरु झाल्यानंतर संबंधित रुग्ण 27 मार्च रोजी जिल्हा रुग्णालय तथा शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल झाला होता. त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. 28 मार्च रोजी त्याचा पाॅझिटीव्ह असल्याबाबतचा तपासणी अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला. पहिलाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन त्याच्यावर उपचार करण्यात आले. शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार 14 दिवसानंतरचा तसेच 15 दिवसानंतर असे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. 13 एप्रिल रोजी रोजी 14 दिवसानंतर तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्याचा तर 14 एप्रिल रोजी 15 दिवसानंतर तपासणी निगेटीव्ह असल्याचा अहवाला प्राप्त झाला. त्यानुसार दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तो कोरोना मुक्त झाल्याने त्याला बुधवारी डिचार्ज देवून घरी सोडण्यात आले.

उपचार करणारे हे होते.. रिअल हिरो

कोरोना संसर्ग वार्डात पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करणार्‍यासाठी शिपमध्ये डॉक्टर, पारिचारिक असे एकूण 36 जणांचा स्टॉप अहारोत्र कार्यरत होता. यात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, पारिचारिका व कर्मचारी, नेहा चौधरी, रोहन केळकर, शालीनी खानापूरकर, डॉ. प्रसाद, तुषार सोनवणे, गजानन चौधरी, सविता अग्नीहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनिषा सोळुंखे, शंकुतला सुरवाडे, निलम पाटील यांनी अहारोत्र रुग्णांची सेवा केली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन त्याला 17 दिवसात बरे करणारे हेच खरे रिअल हिरो ठरले.

डॉक्टर, सिस्टर ठरले देवदूत…पुर्नजन्म झाला…

कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी प्रचंड घाबरलो होतो. पुन्हा बरा होवून घरी परतले, असे वाटले नव्हते. माझे कुटुंबही तणावात होते. मात्र अत्यंत चांगल्या पध्दतीने उपचार झाले, अगदी कुटुंबातील सदस्य समजूनच येथील कर्मचार्‍यांनी माझ्यावर उपचार केले आणि मी 17 दिवसात बरा झालो. माझ्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर, कर्मचारी माझ्यासाठी देवदूत ठरले. पुर्नजन्म मिळाल्याची भावना असून खूप आनंद होते आहे. माझ्यावर उपचार करणार्‍या सर्व डॉक्टर, सिस्टर व कर्मचार्‍यांसाठी मी खूप खूप आभारी आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित रुग्णाने बोलतांना व्यक्त केली.