जिओ परेश रावल

0

समाजात जेव्हा एखादा वरिष्ठवर्ग अभिजनवर्ग असतो तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. त्याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाबाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना, ते जाणूनबुजून असभ्यरीतीने वागतात. सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करताना या कृत्रिम सभ्यतेवर आणि कृत्रिम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रिम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्वीकारल्या जातात. पण याचा अर्थ असा नव्हे की, सभ्यतेचा दंडकच झुगारून देण्यात आलेला असतो. समाजातील व्यक्ती एकमेकांची कदर करीत, सामंजस्याने, सुसंवादाने एकत्र राहायचे असले तर समाजात सभ्यतेचे दंडक असावेच लागतील. समाजात असे दंडक आहेत याचा अर्थच असा की, समाजातील बहुसंख्य माणसे बहुसंख्य प्रसंगी ते दंडक पाळतात. शिवाय, याचा अर्थ असा की, जबाबदारीने वागणारा माणूस हे सर्व दंडक प्रसंगी पाळायचा सतत प्रयत्न करीत असतो. (प्रा. में पुं रेगे.- नवभारत जाने-फेब्रु 1997)

प्रा. रेगे सर हे 1960 च्या दशकात उदयास आलेल्या अनेक जण क्रांतिकारक विचारांचे आद्यगुरू मानले जातात. आज आपण विविध वाहिन्यांवर ज्यांना ज्येष्ठ विचारवंत किंवा अभ्यासक विश्‍लेषक म्हणून बघत असतो, त्यांची वैचारिक जडणघडण रेगेसरांच्या अभ्यासवर्गातून झालेली आहे. दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका मुलाखतीतील भाषेवरून गदारोळ माजला होता. त्यावरून टिपणी करताना रेगेसरांनी सविस्तर लेख लिहिला होता. त्यातले हे अवतरण इतक्यासाठी इथे मांडले, की यातून सभ्य म्हणून मिरवणार्‍यांची नेमकी व्याख्या स्पष्ट व्हावी. आजकाल सोशल माध्यमातील मुजोरी वा अपशब्द यांची खूप चर्चा होत असते आणि त्यातून सभ्यतेवर प्रवचने झाडली जात असतात. म्हणून हा संदर्भ महत्त्वाचा ठरावा.

कालपरवा अरुंधती रॉय या लेखिकेविषयी परेश रावल नावाच्या अभिनेत्याने अनुदार उद्गार काढल्यावरून जो वर्ग चवताळून उठला होता, त्यांनी सभ्यता म्हणजे काय? त्याचे वास्तविक प्रदर्शन घडवले. त्यांच्या सभ्यतेची व्याख्या व व्याप्ती रेगेसरांनी अगदी मोजक्या शब्दात इथे करून ठेवलेली आहे. ज्यांना परेश रावल किंवा अभिजित नावाच्या गायकाची भाषा खटकली वा आक्षेपार्ह वाटली, त्यांना आजकालच्या जमान्यात अभिजनवर्ग म्हणून ओळखले जाते. निदान ते तशी आपली ओळख करून देण्यात सातत्याने गर्क असतात. म्हणूनच हिरिरीने ते रावळ वा अभिजितचा निषेध करायला पुढे सरसावत असतात. पण, वास्तवात त्यांचा हा उत्साह सभ्यतेचा बचाव वा संरक्षण यासाठी नसतोच. त्यातून त्यांना अन्य कुणाला तरी हीन लेखण्याची खुमखुमी असते. कारण अशी व्यक्ती त्यांच्या वर्तुळातली नसते. थोडक्यात अभिजन वा सभ्य म्हणजे एक ठरावीक मूठभर लोकांचे टोळके असते आणि आपले वेगळेपण दाखवून त्यामार्गे आपले उच्चभ्रूपण सिद्ध करण्याचा आटापिटा ही मंडळी सातत्याने करीत असतात. साहजिकच त्याला मान्यता मिळावी म्हणून त्यांना प्रत्येक बाबतीत इतरेजनांना हीन लेखून वा अवमानित करून आपले मोठेपण सिद्ध करण्याला पर्याय नसतो. पण, व्यवहारत: बघितले तर तेच अन्य लोकांशी वा त्यांच्या वर्तुळाबाहेरील लोकांनी अतिरेकी असभ्यतेने वागत असतात. ज्या अरुंधतीच्या प्रतिष्ठेसाठी अशी सभ्य मंडळी धावून आली, ती अरुंधती वा तत्सम अभिजनवर्ग पदोपदी इतरांना असभ्यपणे संबोधत असतात. पण, त्या असभ्य वा असंस्कृतपणाची दखल हा अभिजन वर्ग कधीच घेताना दिसणार नाही. उलट त्या असभ्यपणाचेही समर्थन करताना आढळून येईल. रेगेसर त्यालाच अभिजनांनी परस्परांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे वर्तन असे म्हटलेले आहे. त्याचा अर्थ काय होतो?

आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे, असे सामान्य अडाणी लोक बोलतात. त्याचीच अत्यंत सोज्वळ भाषेत रेगेसरांनी मांडणी आहे. म्हणजे अरुंधती आपली किंवा आपल्या पुरोगामी वर्तुळातील आहे, तर तिच्या अपशब्दांचे वा असंस्कृत वर्तनाचेही अतिरेकी विरोधाभासी युक्तिवादातून समर्थन करायचे. म्हणजे एकमेकांशी अतिरेकी सभ्यतेचे वर्तन होय. पण, त्या अभिजन वर्गाच्या बाहेरचा कोणी असेल, तर त्याच्याशी मात्र अतिरेकी असभ्य वागायचे. असभ्य कोण वागतात? जे अभिजन असतात असे लोक. याचा अर्थ अरुंधतीच्या समर्थनाला धावले ते सभ्य लोक, आज परेश रावलविषयी अतिरेकी असभ्य वागत आहेत. अन्यथा, त्यांनी यापूर्वी अरुंधती इतरांशी असभ्य वागली, तेव्हाही तितक्याच अगत्याने व हिरिरीने निषेधाला पुढे यायला हवे होते. पण, तसे कधी होणार नाही. शेकडो वर्षांपूर्वी तसे कधी झालेले नाही आणि आज एकविसाव्या शतकातही होणार नाही. कारण सभ्यता ही अतिशय कृत्रिम गोष्ट आहे, तितकीच दांभिक बाब आहे. सभ्यता असे काहीही नसते. एका गटाने आपल्या वागण्यालाच सभ्य म्हणजे उच्चभ्रू ठरवून, इतरांच्या माथी मारलेली बाब म्हणजे सभ्यता! ती बाब इतरांच्या माथी मारण्यासाठी मग तसे जो वागत नसेल, त्याला सतत हिणवत राहायचे. त्याच्याविषयी कुत्सित बोलायचे. त्याला हतोत्साहित करायचे, ही अभिजन वर्गाची या कारवाईतील हत्यारे असतात. त्यातून ही सभ्य अभिजन मंडळी अवघ्या समाजावर किंवा लोकसंख्येवर आपली नैतिक हुकमत गाजवत असतात. त्यामागे त्यांची सभ्यता संस्कृती प्रभावी व उच्चभ्रू असते, असे अजिबात नाही. तुमच्या वा इतरेजनांच्या मनात न्यूनगंड जोपासून अशी संस्कृती इतरांच्या माथी मारली जात असते. आताही अरुंधतीविषयी जे काही अपशब्द वा अश्‍लाघ्य शब्द वापरले गेले आहेत, ते खरेच असंस्कृत असतात काय? त्या शब्दांना कोणी असभ्य ठरवले आहे?

आजकाल कुठल्याही उच्चभ्रू कॉलेज वा सोहळ्यात गेलात तर तथाकथित अभिजन समाजात मोडणार्‍या मुलांच्या तोंडी सहजगत्या आयला, मायला असे शब्द कानी पडतात. या शब्दातून काय ध्वनित होत असते? च्यायला किंवा च्या मायला असे शब्द एका मातेचा वा महिलेचा उद्धार करणारे नसतात काय? पण सरसकट त्याचा उच्चार होत असतो. कुठल्याही वर्गात वा समाजघटकात हे शब्द सामान्य होऊन बसले आहेत. पण मुळात हे शब्द सभ्य कुठून ठरले? त्याचेही उत्तर रेगेसरांनी दिलेले आहे. तथाकथित सभ्य लोकांच्या अखंड प्रयत्नानंतरही जेव्हा काही गोष्टी समाजात रुजतात आणि अपरिहार्य होतात, तेव्हा ज्यांनी त्यांना असभ्य घोषित केलेले असते, तेच औदार्य दाखवून त्याच अपशब्दांना वा असभ्य चालीरीतींना सभ्य म्हणून घोषित करून टाकतात. कधीकाळी मराठी साहित्यात नामदेव ढसाळच्या रचनेत अश्‍लिलता शोधणारा अभिजनवर्ग होता. तुकारामालाही अभंग बुडवायला लावणारा अभिजनवर्ग होता. त्यानंतरही तुकाराम वा नामदेव ढसाळ नामशेष होत नाहीत, तेव्हा अभिजनवर्गाला आपले वर्चस्व टिकवण्यासाठी त्याच अभंग व कवितांना मान्यता द्यावी लागते. मग नंतरच्या पिढीतले अभिजन त्याच संस्कृतीची जपणूक करीत असल्याच्या आवेशात पुढल्या पिढीतल्या नामदेव, तुकारामांची निंदानालस्ती करण्यात गढून जात असतात. आजवर कुठल्याही पिढीतल्या वा युगातल्या अभिजनवर्गाने संस्कृती निर्माण केल्याचा दाखला मिळत नाही. पण त्याच वर्गाने ज्याची असभ्य वा असंस्कृत म्हणून कायम निर्भर्त्सना केली, त्याच हीन असंस्कृत वर्गाने संस्कृतीचे नवनवे निकष प्रस्थापित केलेले दिसतील. कारण अभिजनवर्ग हा कायम दांभिक व ढोंगी असतो आणि आपला नाकर्तेपणा वा वांझोटेपणा लपवण्यासाठी या वर्गाला नेहमी इतरांना हीन लेखून वा त्यांच्यात न्यूनगंड जोपासूनच, आपले मोठेपण सिद्ध करावे लागत असते.