जिग्नेश मेवाणींचा शनिवारवाड्यावर एल्गार

0

पुणे : भीमा कोरेगावच्या लढ्याला 200 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुमारे 16 जिल्ह्यातील 200 ते 250 संघटनांनी भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान आघाडीची उभारणी केली आहे. संविधान वाचवा, लोकशाही चालवा, देश वाचवा अशी या आघाडीची भूमिका आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांवर चालणार्‍या संघटना या अभियानाचा भाग आहेत. नव्या पेशवाई विरोधात 31 डिसेंबररोजी दुपारी दोन ते रात्री आठ वाजेदरम्यान शनिवारवाडा येथे सांस्कृतिक एल्गार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती संतोष शिंदे यांनी दिली. या परिषदेसाठी गुजरातमधील नवनिर्वाचित दलित आमदार जिग्नेश मेवाणी तसेच उमर खालिद हे उपस्थित राहणार आहेत.

दहा जिल्ह्यांतून येणार प्रेरणा मार्च
या आघाडीतर्फे प्रेरणा मार्च दहा जिल्ह्यामधून येणार आहे. त्याची सुरुवात 23 डिसेंबरला नाशिकमधील येवला येथून झालेली आहे. हा प्रेरणा मार्च 31 डिसेंबरला अनेक जिल्ह्यांमधून येऊन शनिवारवाड्यावर पोहोचेल. त्यानंतर 31 तारखेलाच एल्गार सभेची सुरुवात होईल. महाराष्ट्रातील पुरोगामी शाहिरीचा जलसाही होणार आहे. पहिल्या सत्रात जिग्नेश मेवाणी, उमर खालिद, विनय रतन सिंग, प्रशांत डोंथा आदी वक्ते असणार आहेत.

कोळसे-पाटील, अझहरी, आंबेडकर यांची उपस्थिती
परिषदेच्या दुसर्‍या सत्रात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, बी. जी. कोळसे पाटील, उल्का महाजन, सोनी सोरी, मौलाना अब्दुल हमीद अझहरी आदी वक्ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी सर्व रवाना होतील. लोकशाही मार्गाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, संविधानाच्या चौकटीत राहून कार्यक्रम करणार असल्याचे शिंदे म्हणाले. याशिवाय, कुणाचा याला विरोध असल्यास चर्चा करायला ते तयार आहेत असेही त्यांनी म्हटले. यावेळी मानव कांबळे, अंजुम इनामदार, किशोर कांबळे, ज्योती जगताप, दत्ता पोळ, नितीन गायकवाड उपस्थित होते.