1 जानेवारी 2017 ला नवीन वर्ष साजरे करणारा जनसमुदाय, बंगळुरूमध्ये गोळा झाले होते. दारू पिऊन आचकटविचकट नाचत हॅप्पी न्यू इयर म्हणत होते. दारूच्या नशेत हळूहळू जमाव विकृतीकडे वळू लागला. आईबहिणींच्या शरीरावर भुकेल्या लांडग्यासारखे बघू लागला. मग ताळतंत्र सोडून त्यांच्या अंगावर हात घालू लागला व भगिनींच्या अब्रूचे धिंडवडे उडवू लागला. जोरात ओरडू लागला हॅप्पी न्यू इयर, असे अनेक प्रकार भारतभर फोफाऊ लागले. म्हणूनच जिजामातेच्या जयंतीनिमित्त लिहिताना हा देश राज्यांच्या पाटलाचा आहे की छ. शिवरायांचा आहे हा प्रश्न 2017 ला निर्माण झाला आहे.
कोपर्डीच्या हत्याकांडानंतर मोर्चे निघाले अनेक पण रांजाच्या पाटलाचा अंमल वाढतच चालला. बलात्कार होतच चालले. हात पाय कलम करणारा शिवराय पुन्हा केव्हा निर्माण होणार यांची वाट सर्व अबला बघत असतील. पण तो कधीच निर्माण होणार नाही हे लक्षात ठेवा. आपले संरक्षण आपणच करायचे. तुम्हीच जिजाऊ, तुम्हीच ताराराणी, तुम्हीच अहिल्याबाई बनल्याशिवाय या पाशवी वृत्तीला काबूत आणू शकत नाही. मोघलाई कशाला म्हणतात तर याच पाशवी प्रवृत्तीला. सरदार, अंमलदार, राजे, राजवाडे, देशपांडे, देशमुख स्त्रिया या आपली मालमत्ता समजतात. युरोपमध्ये असो का अरबस्तानमध्ये असो का भारतात असो. मध्ययुगात स्त्री सत्तेचे अवशेष पूर्ण नष्ट झाले आणि पुरुषी कौर्याचे पर्व प्रचलित संस्कृती बनली. म्हणूनच इस्लामने स्त्रियांना पडद्यात टाकले. अशा स्थितीत जिजामातेचा जन्म झाला. आजूबाजूला ही भयानक परिस्थिती बघून जिजाऊला संताप आला नसेल तर नवलच. तिच्या पित्याने मात्र तिला योद्धा बनवले. शहाजी महाराजांनीदेखील जिजाऊंना राज्य चालवण्याची जबाबदारी दिली. स्त्रियांना आत्मसंरक्षण करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवरायांचा जन्म झाला. जिजाऊने शिवरायांना राज्य निर्माण करण्याची प्रेरणा तर दिलीच पण त्याहीपेक्षा न्यायाचे आणि समतेचे बाळकडू पाजले. त्यातूनच निर्माण झाले ते धाडस. एका वतनदाराला शिक्षा करण्याची हिंमत. 16 व्या वर्षी एका गरीब मुलीवर बलात्कार केला म्हणून राज्यांच्या पाटलाचे हातपाय छाटून टाकणे म्हणजे त्या काळात कमालीचे धाडस होते. अर्थात जिजामातेच्या प्रेरणेतूनच निर्माण झालेला रयतेच्या राजाचा तो जन्म होता. महाराष्ट्रातील प्रत्येक पित्याला, भावाला, मातेला तो एक ज्वलंत संदेश होता की आजपासून या महाराष्ट्रात कुठल्याही स्त्रियांवर अत्याचार झाला तर खबरदार. शिवरायांची तलवार त्या नराधमांची खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही.
आपले राज्यकर्तेच आधुनिक सरदार, राजे राजवाडे बनले व स्त्रियांच्या शोषणाचे जनक बनले. मनमोहन सिंग, शरद पवार, मोदी किंवा उद्धव ठाकरेंनी, स्त्री अत्याचारावर काही म्हटल्याचे किंवा केल्याचे मला तरी आठवत नाही. सर्व प्रश्नांपेक्षा हाच प्रश्न आज समाजाला भेडसावत आहे. बंदुकीच्या जोरावर आपण जगावर राज्य करू शकत नाही तर संस्कृतीने जगावर कब्जा करायचा. म्हणून अमेरिकन भांडवलशाहीने एक नवीन संस्कृती निर्माण केली. सेक्स आणि शराबची. राष्ट्राध्यक्षाच्या बायकोचे फोटो फिरत आहेत आणि ट्रम्पने बायका या वापरण्याचे साधन असे जाहीर केले. परिणाम काय झाला तर ट्रम्प एका महिलेविरुद्ध अमेरिकन राष्ट्रपती म्हणून निवडून आला. त्यातही आश्चर्य म्हणजे 53% गोर्या महिलांनी ट्रम्पला मतदान केले. अमेरिकेत स्त्रियांवर अत्याचार करणे हे स्वीकारण्यात आले असेच म्हटले पाहिजे. दारूची विक्री झपाट्याने वाढली. पूर्वी लोक चोरून दारू प्यायचे आता प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये दारू पिण्याचे शिक्षण दिले जाते. भारताची संस्कृती काय? साधी राहणी उच्च विचारसरणी, शेजारधर्म अशी होती. तिचे समूळ उच्चाटन करून सनी लिओनला मान्यता देऊन पैशासाठी पिक्चरवर सेक्स करण्याला प्रतिष्ठा दिली. अशा अवस्थेत भारतीय समाज विध्वंसाकडे झपाट्याने चालला आहे. कोण रोखणार? सरकार? अजिबात नाही. कायदा या गोष्टी रोखू शकत नाही. तर समाजालाच हा उठाव करावा लागेल. सिनेमातील विकृत चित्रण आधी बंद केले पाहिजे. सेन्सॉर बोर्ड तर मोदींच्या राज्यात नसल्यासारखाच आहे. हे सिनेमा जनतेने बंद पाडले पाहिजेत. कलाकृतीच्या नावाखाली विकृत खपवून घेणार नाही हा संदेश दिला पाहिजे. सभ्यता अशी काही गोष्ट अस्तित्वात आहे हे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना संस्कारित केली पाहिजे. नुसते जय भवानी, जय शिवाजी – टाक वर्गणी म्हणून शिवशाही जिवंत होत नाहीत. गावागावांत महिला सुरक्षा दल स्थापन केले पाहिजे. एकंदरीत भारताच्या संस्कृतीत जीवनाचे पुनर्बांधणी झाली पाहिजे. हे सोपे नाही पण अशक्यदेखील नाही. यासाठी महिलांनाच पुढाकार घ्यावा लागेल. म्हणूनच जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई यांचा आदर्श बाळगून स्त्री सन्मानाचे नवीन पर्व भारतात आणू या. 16 डिसेंबरला मुंबई येथे दुसर्या सभेला सर्वांनी जमू या.
– ब्रिगेडिअर सुधीर सावंत
9987714929