जिजामाई शाळेला आयएसओ

0

भुसावळ। तालुक्यातील खडका येथील जिजामाई प्राथमिक विद्यामंदिराने आयएसओ मानांकन पटकावून भुसावळ तालुक्यात शैक्षणिक विकासात मानाचा तुरा रोवला आहे. तालुक्यातील जि.प.च्या गोंभी शाळेसोबतच या एकमेव विद्यामंदिराला आयएसओ मानांकन मिळाले आहे. मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हे मानांकन प्राप्त झाल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. शाळेच्या भिंतीदेखील बोलक्या करण्यात आल्या असून 232 पटसंख्या असलेल्या या शाळेत संगणकासह प्रोजेक्टरवर मार्गदर्शन करण्यात येते शिवाय वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही देखील लावण्यात आल्याने पालकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

संस्थाचालकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
आयएसओ मानांकन मिळण्यामागे शिक्षकांसह संस्थाध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप भोळे यांची प्रेरणा मोलाची आहे. भोळे यांच्या संकल्पनेतून शाळेत विविध उपक्रमांची अंमलबजावणी शिक्षकवृंदांकडून करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यासोबतच सुसज्ज ग्रंथालय, संगणक लॅब, प्रशस्त पटांगण, सर्व खेळण्यांनी संपन्न उद्यान विकसीत करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढत आहे.

शाळेचा घ्यावा आदर्श
भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील एकमेव आयएसओ मानांकन प्राप्त ठरलेल्या खडका येथील जिजामाई प्राथमिक विद्यामंदिराचा प्रत्येक शाळेने आदर्श घ्यावा, असे उपक्रम येथे राबवले जातात. पहिली ते चौथीच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत, गेल्या चार वर्षांपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, शाळेच्या प्रत्येक भिंतीवर शैक्षणिक चित्र, अंक, माहिती, तक्ते रेखाटण्यात आले आहेत. शाळेत ज्ञानरचनावादी पद्धत्तीने शिक्षण देण्यात येते.

विद्यार्थी घडवणारे शिल्पकार

पुस्तकी ज्ञानासोबत बाहेरील जगातील घटना – घडामोडींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मुख्याध्यापक संजय साखरे, उपशिक्षक ज्ञानदेव पाटील, नीलिमा भंगाळे, नीलेश महाजन आदी तज्ज्ञ शिक्षकवर्ग अहोरात्र परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांचे सर्वसामान्य ज्ञान वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

ग्रामीण भागात रोवला तुरा
शहरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वारे ग्रामीण भागात पोहोचल्याने ग्रामीण भागातील जि.प.शाळांसह खाजगी शाळांकडे पालकांचा पाहण्याचा दृष्टीकोन गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. या पार्श्‍वभूमीवर खडकासारख्या छोट्या खेडे गावातील शाळेने आयएसओ मानांकन मिळवणे म्हणजे गावासह ग्रामस्थांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणेच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पहिली ते चौथीचे वर्ग असून 232 इतकी पटसंख्या आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळेची गुणवत्ता व पटसंख्या टिकवणे जिकिरीचे काम आहे मात्र संस्था चालकांच्या अनमोल मार्गदर्शनाने प्रगतीची घोडदौड सुरु आहे. आयएसओ मानांकन मिळाल्याने ज्ञानदानाचा उत्साह दुणावला आहे.
नीलिमा तुकाराम भंगाळे, उपशिक्षिका, जिजामाई विद्यामंदिर