मुंबई । मुंबईजवळच्या समुद्रात ’डॉल्फिन’ दिसणे तसे दुर्मीळच! स्टारफिश, ऑक्टोपस, कासव यांसारखे जलचर बघायचे झाले, तर आपल्याला मत्स्यालयातच जावे लागते. मात्र, आता याच जलचरांना जवळून अनुभवण्याची संधी महापालिकेच्या उद्यान प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे. महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात 9 ते 11 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या वार्षिक उद्यान प्रदर्शनात जलपरी, डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, अॅनाकोंडा इत्यादींच्या फुलांपासून तयार केलेल्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रतिकृती ठेवण्यासाठी सुमारे 100 मीटर लांबीची एक कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून, तिच्यात एक फुलांनी सजवलेला ’शिकारा’देखील असणार आहे.
महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे दरवर्षी साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात उद्यान विषयक प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनात गेल्यावर्षीपासून एक विषय घेऊन त्यावर आधारित पुष्परचना, वृक्षरचना विशेषत्वाने प्रदर्शित करण्यात येतात. यावर्षी जलप्रदुषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारादेखील (काश्मिरी पद्धतीची नाव) या नदीमध्ये असणार आहे. यासोबतच डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, अॅनाकोंडा यासारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत.
’महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम 1975’मधील तरतुदींनुसार दरवर्षी वृक्ष प्राधिकरण व महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार्या फुले, फळे व भाज्या याविषयीच्या वार्षिक प्रदर्शनाचे हे 23 वे वर्ष आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कुंड्यांमधील शोभिवंत झाडे, पुष्परचना, फुलझाडे, लॅण्डस्केप आर्ट आदी विविध विषयांवरील स्पर्धादेखील आयोजित करण्यात येत असतात. या स्पर्धांमध्ये शासकीय, निमशासकीय यासह खासगी क्षेत्रातील संस्था/कंपन्यादेखील आपली कला सादर करत असतात.
विविध झाडे बघावयास मिळणार
9 फेब्रुवारी 2018 पासून सुरू होणार्या या प्रदर्शनात विविध प्रजातींची 10 हजारांपेक्षा अधिक झाडे बघावयास मिळणार आहेत. यामध्ये कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय, वेली यांचा समावेश आहे. तसेच विविध प्रकारची तुळशीची झाडे, बेल, हळद, कापूर, आवळा, बेहडा, हिरडा, चंदन बडीशेप, अश्वगंधा, बदाम, काजू यांसह हात लावताच पाने मिटून घेणार लाजाळूचे झाड यांसारखी अनेक औषधी व सुगंधी झाडे या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत.