नवी दिल्ली: भारतीय नेमबाजांकडून सोमवारी जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत एका सुवर्णपदकाची कमाई झाली. जितू राय आणि हिना सिंग या जोडीने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. जितू राय आणि हिना सिंग यांनी मिश्र प्रकारातील १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानच्या जोडीचा पराभव केला. मात्र, मिश्र प्रकार प्रायोगिक तत्त्वावर खेळवण्यात येत असल्याने या दोन्ही खेळाडूंच्या गुणांमध्ये त्यामुळे कोणताही फरक पडणार नाही. काही दिवसांपूर्वी भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकाराऐवजी मिश्र लढती आयोजित करण्याची सूचना केली होती.
मिश्र लढतींची चाचपणी सुरू
नोव्हेंबर २०१५ मध्येही ५० मी रायफल प्रोन पुरुष, ५० मीटर पिस्तूल पुरुष, डबल ट्रॅप पुरुष प्रकाराच्या लढती मिश्र स्वरूपात रूपांतरित करण्याची शिफारस बिंद्रा समितीने आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेला केली होती. या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात मिश्र लढतींची चाचपणी सुरू आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत प्रत्येक खेळात महिलांचे प्रतिनिधित्व ५० टक्के असावे यासाठी प्रत्येक खेळाच्या संघटनेने प्रयत्नशील असावे, असे निर्देश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिले होते. सद्य:स्थितीला ऑलिम्पिक स्पर्धेत नऊ प्रकारांत पुरुषांच्या लढती होतात, तर महिलांसाठी सहा प्रकार आहेत.
मान्यतेनंतर प्रस्ताव मंजुरीसाठी
शारीरिक संपर्क असणाऱ्या कुस्ती, बॉक्सिंग आणि फुटबॉलसारख्या खेळांमध्ये मिश्र प्रकारात लढती आयोजित करण्याची पद्धत रद्द करण्यात आली. मात्र नेमबाजी खेळाचे स्वरूप एकाग्रतेशी संलग्न असल्याने मिश्र प्रकाराचा प्रस्ताव मांडण्यात आला. काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिश्र प्रकारात लढती होत असत. मात्र १९८४ मध्ये पुरुष आणि महिला गट वेगवेगळे करण्यात आले. आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या मान्यतेनंतर हा बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे सादर होईल. ऑलिम्पिक समितीने मंजुरी दिल्यास २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५० मी. पिस्तूल, ५० मीटर रायफल प्रोन आणि डबल ट्रॅप प्रकारात फक्त पुरुषांसाठीच्या लढती न होता मिश्र प्रकारात लढती होतील.
दुसऱ्या दिवशीची निराशा झटकली
भारतीय नेमबाजांना आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पदक पटकावता आले नव्हते. जोरावरसिंग संधू व नीरजकुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या ट्रॅप व २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीमध्ये निराशा केली होती. मात्र तिसऱ्या दिवशी जितु आणि हीनाने जबरदस्त कामगिरी करत भारताला यश मिळवून दिले. पुरुषांच्या १० मीटर फायनलमध्ये दीपक कुमार पाचव्या स्थानी राहिला, तर मेघना सज्जनार पात्रता फेरीत १०व्या स्थानी होती. ट्रॅप स्पर्धेत इटलीची सिमोन एम्ब्रोसियोने विश्वविक्रमासह सुवर्ण पटकावले. जियोवान्नी पेलियेलोने रौप्य, तर स्पेनच्या अलबर्टो फर्नांडिसने कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुलमध्ये चीनच्या जियेजी लाओने सुवर्ण आणि जुनमिन लीनने रौप्यपदक पटकावले. अजरबैजानच्या रुस्लान लुनेव्हला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक फायनलमध्ये चीनच्या बुहान सोंग व मिंगयांग वू यांनी सुवर्णपदक पटकावले. जपानच्या अत्सुशी शिमाडा व अयानो शिमिझू दुसऱ्या, तर चीनचे मेंग्याओ शी व गेंगचेंग सुई तिसऱ्या स्थानावर राहिले.