जिद्द निर्माण करुन स्पर्धा परीक्षेकडे वळावे- भरत कासोदे

0

गटविकास अधिकारी भरत कासोदे यांचे आवाहन

धानोरा- ग्रामीण भागातील विद्यार्थांनी अभ्यासात जिद्द निर्माण करुन स्पर्धा परीक्षेकडे वळावे, यातुन प्रगती साधत प्रामाणिक अधिकारी व्हावे, असे आवाहन चोपडा पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. भरत कासोदे यांनी केले. त्यांनी नुकतीच येथील डॉ बी आर आंबेडकर अभ्यासिकेला भेट देऊन तरूणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुस्तकांसाठी 5हजार 500 रूपयांची भेटही दिली.

अधिकार्‍यांनी साधला तरूणांशी संवाद
तरुण पिढी अभ्यासात कमी व व्यसनाच्या आहारी जास्त जात असल्याने त्यांनी तसे न करता सामाजिक कार्याला हातभार लावून नोकरीला लागले पाहीजे, यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे कासोदे यावेळी म्हणाले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी एस बी कोळी यांच्यासह अभ्यासिकेचे संचालक प्रशांत सोनवणे, अमोल महाजन उपस्थित होते. दरम्यान यावेळी तरूणांनी मांडलेल्या काही प्रश्‍नांचे अधिकार्‍यांनी समाधान केले. यात सुनिल कोळी, नितिन सैंदाणे, मनोज पाटील, विलास सोनवणे आदींनी सहभाग घेतला. येथिल डॉ बी आर आंबेडकर अभ्यासिकेत लोकसहभागातुन तब्बल सव्वा लाख रुपये किंमतीची विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यात अभ्यासक्रम, मार्गदर्शिका, प्रश्‍नपत्रिका संच, ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरवात आदी सेवा पुरवल्या जात आहेत. विशेष म्हणजे ही अभ्यासिका पूर्ण 24 तास सुरु असते.