जिनियस बेकर्सने जिंकला ‘टी-20’ क्रिकेट चषक

0

भुसावळ। येथील नानासाहेब देविदास फालक स्पोर्टस अ‍ॅकेडमीतर्फे आयोजित ऑल इंडिया टी-20 क्रिकेट चषकामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात नाशिक क्रिकेट अकादमीविरुध्द जिनियस बेकर्स भुसावळ यांच्यात सामना रंगला. यात नाणेफेक जिनियस बेकर्स भुसावळने जिंकली व प्रथम फलंदाजी करत 192 धावांचे लक्ष्य नाशिक क्रिकेट अकादमीसमोर ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करतांना नाशिकने अतिशय चुरस निर्माण करत शेवटच्या चेंडूपर्यंत सुरु असलेल्या सामन्यात 181 धावा काढल्या व जिनियस बेकर्सने हा सामना 10 धावांनी जिंकला.

अभिषेक राऊत ठरला मालिकावीर
या सामन्यात सामनावीर म्हणून खालिद अन्सारी याची निवड करण्यात आली. त्याने 83 धावा व 1 गडी बाद केला. सर्वोत्कृष्ट मालिकेतील फलंदाज म्हणून 158 धावा काढणारा गणेश लोहार याची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट गोलंदाज 10 गडी बाद करणारा खालिद अन्सारी याची निवड करण्यात आली. मालिकावीर म्हणून आयपीएल खेळाडू अभिषेक राऊत याने खेळलेल्या प्रत्येक सामन्यात 50 धावा व अंतिम सामन्यात 100 धावा करत या मालिकेतील प्रथम शतक ठोकले. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली.

नाशिक क्रिकेट अकादमी उपविजेता
उपविजेता म्हणून नाशिक क्रिकेट अकादमी तर तृतीय स्थान मुंबई घाटकोपर संघाला मिळाले. उपविजेत्या संघास 41 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह तर तृतीय संघास 21 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह देण्यात आले तर नानासाहेब देविदास फालक करंडकाचे मानकरी ठरलेला संघ जिनियस बेकर्स भुसावळला 71 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी विजेता व उपविजेता संघातील सहभागी खेळाडूंचा मेडल्स देवून सत्कार करण्यात आला.

यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार
सर्व विजयी खेळाडूंना अकादमीचे सचिव महेश फालक, सहसचिव विष्णू चौधरी, महाराष्ट्र स्पोर्टस्चे नितीन ढाके, शिखर संस्थेचे रफिक शेख, विशाल झोपे, राहुल यावलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुत्रसंचालन प्रा. प्रशांत पाटील, प्रा.डॉ. आनंद उपाध्याय यांनी केले. यशस्वीतेसाठी जावेद खान, मयुर सोहळे, जयेश चावरिया, मनोज चौधरी, निखिल ठाकुर, अक्षय शर्मा, मनोज घुले, सुरज मायटी, शुभम शर्मा यांनी परिश्रम घेतले