जिल्हात पावसाच्या जोरदार मुसंडीने मालमत्तेची पडझड

0

रत्नागिरी : दोन दिवस जिल्हाभरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, लांजा व राजापूर या तालुक्यांना चांगलेच झोडपून काढले. त्यामध्ये वादळी वार्‍याने 22 जणांच्या घर व इतर मालमत्तेची मोठी पडझड झाली. या झालेल्या नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात जिल्हाभरात सुमारे 3 लाख 91 हजाराची वित्तहानी झाली आहे. सर्वाधिक नुकसान संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यात झाले आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनस्तरावर पंचनामा कार्यवाही ग्रामस्तरावर करण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात ओरी येथील प्रकाश गणपत आलिम यांच्या घराचे वादळी वार्‍यामुळे 36 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे. कोतवडे येथील एकनाथ विठ्ठल सनगरे यांच्या घराचे 6 हजार 825 रुपयाचे नुकसान झाले. बसणी येथील उज्ज्वला नामदेव रावणांग यांच्या घरावर वीज पडून 24 हजाराची हानी झाली. पुरुषोत्तम कृष्णा रावणांग यांच्या घराचे 51 हजाराचे नुकसान झाले आहे.

संगमेश्‍वर तालुक्यातील दाभोळे येथील सुनील दौलत बेलकर यांच्या घराचे 1300 रु., लक्ष्मण कोलापटे 2100 रु., चंद्रकांत अजून बाडूल यांच्या घराचे 2500 रु., येथील जिल्हा परिषद शाळा क्र. 2 चे 1 लाख 20 हजाराचे नुकसान, कोड येथील शिवाजी पांडुरंग कदम यांच्या घराचे 8400 रु., तळे येथील कांचन किसन बने यांच्या घराचे 11200 रु., तळेकांटे येथील एकनाथ बने यांच्या घरावर वीज पडून 11000 रु. मुचरी येथील संतोष श्रीपत जाधव यांच्या घराचे 7100 रु. तळेकांटे येथे एमआयडीसी ने बांधलेला बंधारा वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.

चिपळूण तालुक्यातील गवाळवाडी येथील जयवंत गोपाळ घवाळे यांच्या घराचे 17200 रु., गुहागरमधील उब्रट येथील सरस्वती तानाजी गावगंण यांच्या घराचे 5575 रु., हेदवी येथील श्रीराम काशिनाथ ओक यांच्या घराचे 14000 रु. चे नुकसान झाले आहे.

लांजामधील साटवली येथील संजय गोणकर यांच्या घराचे 5400 रु., सुनिता माधव गोणकर यांच्या घराचे 36000 रु., राजाराम दौलत गुरव यांच्या घराचे 36000रु., रामचंद्र गोविंद गुरव यांच्या घराचे 20 हजार 500 रु., राजापूर तालक्यातील कोंडेतढ येथील रमेश रामचंद्र वालेकर यांच्या घराचे 8,350 रु., महादेव रामचंद्र नावेरकर यांच्या घराचे 7350 रु.चे नुकसान झाले आहे.

वीज पुरवठा खंडीत
लांजा तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमधील वीज पुरवठा पहिल्या पावसाच्या आगमनाबरोबर खंडित झाला होता. खंडित झालेला हा वीज पुरवठा दुसर्‍या दिवशी रात्री पूर्ववत करण्यात आला. पहिल्याच पावसात महावितरणची दैना उडाल्याने पुढे काय होणार, असा प्रश्‍न सध्या उपस्थित केला जात आहे. तर पूर्वतयारीच्या कामांचा पहिल्याच पावसात बोजवारा उडाल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यात 30 मे रोजी सायंकाळी पावसाचे आगमन झाले. मुसळधार पडणर्‍या या पावसाबरोबर तालुक्यातील पूर्व भागाच्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हा खंडित झालेला वीज पुरवठा रात्रभर पूर्ववत झालेला नव्हता. त्यामुळे 31 रोजी दिवसभरात वीज पुरवठा पूर्ववत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

पावसाने झाडे कोसळली
राजापूर तालुक्यातील नवेदर येथे वसंत दामोदर पडयार यांच्या घरावरती फणसाचे झाड उफळून पडले. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. यावेळी घरात 6 माणसे असून सुदैवाने घरातील सर्व माणसे सुखरूप असून दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील भोवड यांनी पाहणी करून तलाठयाना माहिती देऊन घटनेचा पंचनामा केला. घरावर झाड पडल्याने घराचे किरकोळ नुकसान झाले. अंदाजे 5 हजारपर्यंत नुकसान झाले. गावातील ग्रामस्थांच्या मदतीने घरावरचे झाड तोडून बाजूला करण्यात आले. जोरदार वृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावात पडझड झाली आहे.