नंदुरबार । ख्रिश्चन मिशनच्या कार्यकर्त्यांना दिला जाणारा त्रास आणि धर्मांतराच्या नावाखाली होत असलेली बदनामी या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ख्रिस्ती समाजाने धडक मोर्चा काढला. शहरातील सी.बी.पेट्रोलपंपापासून या मोर्चांला सुरूवात झाली. पंधरा हजाराहून अधिक संख्येने खिस्ती बांधव मोर्चात सहभागी झाले होते. रणरणते उन असूनही या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.
जिल्हाधिकार्यांना निवेदन
सी.बी.पेट्रोलपंप ते जिल्हाधिकारी कार्यालय असा चार किलोमीटर पायी जात या मोर्चाने निषेध नोंदविला. नजीकच्या गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील पादरी देखील मोर्चात सहभागी झाले होते. दिलीप नाईक, प्रेमदास कालू, आर.सी.गावीत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ख्रिस्ती समाजाला बदनाम करणार्या घटकांवर कारवाई न झाल्यास गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात विराट मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांना मोर्चेकर्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.