पुणे : भाजपाच्या आमदारावर 50 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी सर्व तपास करून आमदारावर व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, सत्ताधारी भाजपने या प्रकाराचा योग्य तपास करणार्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्याची बदली केली. अशा प्रकारे पोलीस अधिकार्यांची बदली करून गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील व काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, मुख्यमंत्र्यानी पारदर्शक कारभार करावा. भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करणार्या पोलिस अधिकार्याची केलेली बदली म्हणजे मुख्यमंत्र्याचा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही किंवा त्यांची या प्रकाराला मूक समंती आहे, खंडणीखोरांना व गुन्हेगारांना पाठिशी घालतात, अशी भावना आहे. मुख्यमंत्र्याकडे गृहखाते असल्याने त्यांनी पारदर्शकपणे या प्रकरणाचा तपास करून पुणेकरांच्या मनातील शंका दूर करावी.
भाजपाने सत्तेचा गैरवापर चालवला असून भाजप आमदारावर व त्याच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन देखील ते मोकाट फिरत आहे. त्यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी अभय छाजेड, बापू पठारे, प्रशांत जगताप, राकेश कामठे, भोलासिंग अरोरा, नितिन कदम, बापू डाकले, नगरसेवक नंदा लोणकर, वनराज आंदेकर, भैय्यासाहेब जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.