पुणे : शिवसेनेतर्फे मंगळवारी महागाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर लाटणे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत आणि महिला संघटिका तृष्णा विश्वासराव पाटील, माजी आमदार आणि शहरप्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, महापालिकेतील गटनेते संजय भोसले तसेच शहरातील नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी या सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. हे सरकार अपयशी ठरले असून, दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या सरकारने दरवाढ मागे घ्यावी अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला.