जळगाव । जागतिक तंबाखू विरोध दिवसाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू विरोधी शपथ दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात आजपासून 6 जूनपर्यंत तंबाखू विरोध सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त जिल्हाधिकार्यांनी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू, जर्दा, खर्रा आणि धुम्रपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, घर आणि परिसर तंबाखू मुक्त रहावा, इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखूमुक्त करण्याची शपथ दिली.
नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी पोस्टरचे अनावरण
यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा जळगाव शाखेच्यावतीने तंबाखू विरोधी दिवसानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या तंबाखू टाळा, हद्यात राहणार्या आपल्या परिवारासाठी आणि समाजासाठी या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तंबाखू विरोधासाठी नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे पोस्टर शहरातील प्रमुख ठिकाणी लावण्यात येणार आहे. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी डॉ. प्रसन्ना रेदासणी, गनी मेमन, विनोद बियाणी, राजेश यावलकर, धनश्याम महाजन यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील व इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालय
जळगाव – जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ दिली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गायकवाड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, दंतशल्य चिकित्सक डॉ संपदा गोस्वामी, ग्रामीण रुग्णालय मुक्ताईनगर येथील डॉ अच्छा, कर्करोग तज्ञ डॉ. निलेश चांडक, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी यांचेसह विविध संस्था, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, नागरीक, दंत विभाग व तंबाखू नियंत्रण कक्षाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.