नंदुरबार । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह दिनांक 8 एप्रिल, 2017 ते 14 एप्रिल, 2017 या कालावधीत साजरा करण्यात येणार असून या सप्ताहाचे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) अशोक बागुल, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पाडवी, सामाजिक वनीकरण विभागाचे आर.एन. जेजुरकर, तहसिलदार राजेंद्र दराडे आदी उपस्थित होते.
कर्ज वाटपाची माहिती
प्रास्ताविकात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी सांगितले की, 9 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर चौक येथे सामाजिक न्याय विभागातंर्गत सर्व महामंडळामार्फत येणार्या विविध योजनांची व त्याअंतर्गत कर्जाचे वाटप लाभार्थ्यांना कशा पध्दतीने करण्यात येते याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. 10 एप्रिल रोजी महाविद्यालये, शाळा, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच शासकीय व अनुदानित वसतीगृहांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाटय प्रश्नमंजुशा वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहे.
प्रचार -प्रसिध्दी करणार
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी बोलतांना म्हणाले की, या सप्ताहात जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणार्या रमाई आवास योजना, कृषि स्वावलंबन योजना स्वआधार योजना, स्टॅन्ड अप इंडिया तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामुहिक, औद्योगिक प्रोत्साहन योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना आदि सर्व योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी जिल्ह्यात मोठया उपक्रम घेण्यात येतील.
14 रोजी सप्ताहाचा समारोप
11 एप्रिल रोजी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन, 12 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेबनगर चौक, शहीद स्मारक येथे व सामाजिक न्याय भवन, शासकीय वसतीगृह निवासी शाळा याठिकाणी स्वच्छता अभियान, 13 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर नगर चौक येथे प्रबोधन पथनाट्य सादर होईल. 14 एप्रिल रोजी बिरसामुंडा सभागृह येथे जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समता सप्ताहाचे समारोप करण्यात येणार आहे.