जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वीकारला पदभार

0

धुळे । जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2011 च्या तुकडीतील अधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी सकाळी पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांची महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या जागी परभणी महानगरपालिकेचे आयुक्त श्री. रेखावार यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार शुक्रवारी श्री. रेखावार यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप भोये, राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ आदी उपस्थित होते.

विविध ठिकाणच्या कामाचा अनुभव
श्री. रेखावार हे मूळचे खडकी बाजार, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथील रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथील पीपल्स हायस्कूलमध्ये झाले. बारावीच्या परीक्षेत ते बोर्डात दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी राजस्थानमधील पिलानी येथे इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याविषयात अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री. रेखावार यांनी भाभा अणुशक्ती केंद्रात काम केले आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येही त्यांनी कामाचा अनुभव घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2011 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत ते देशात 15 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी सुरुवातीला राजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सिंधुदुर्गचे सहाय्यक जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही श्री. रेखावार यांनी काम पाहिले आहे.