जिल्हाधिकार्‍यांनी घेतली शेतकर्‍यांसह बैठक

0

शिंदखेडा। शेतकर्‍यांची राष्ट्रीयकृत बँकामार्फत होत असलेली पिळवणूक व शेतकर्‍यांच्या न्याय मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी यांनी बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी पांढरपट्टे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा प. स. सदस्य शानाभाऊ सोनवणे , आर. बी. आय.चे दंडवतेंसह इतर बँकांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी रजेसिंग राजपूत, युवराज माळी, रमेश पाटील, रामराव पाटील, लोटण देसले, विजय माळी, राजेंद्र माळी, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख बबलू कोळी, शिवसेना उपशहर प्रमुख दोंडाईचा बापू परदेशी आदि उपस्थित होते.

पीककर्ज आठ दिवसात द्या
या बैठकित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यांत पुर्नगठित विषयी रजेसिंग गिरासे या शेतकर्‍याचे नाव स्टेट बॅकेच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी लिहून घेतले. इतर शेतकर्‍यांचे पुर्नगठनाची चौकशी करून नावे असतील ते नाव आमच्याकडे द्यावेत. थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्याला होल्ड लावलेला असतो. परंतु वैयक्तिक लाभाच्या योजनांबद्दल ग्रामसेवक, तलाठी किंवा सरपंच यांचा दाखला दिल्यानंतर होल्ड काढला जाईल असा निर्णय बैठकित झाला. शेतकर्‍यांनी मागील पिक कर्ज भरल्यानंतर नविन पिक कर्ज आठ दिवसाच्या आत शेतकर्‍यांना दिले जाईल. गरजू लाभार्थीना कोटेशन दिल्यानंतर व चौकशी झाल्यावर तात्काळ मुद्रा लोन दिले जाईल आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.