जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा रूग्णालय परिसराची केली पहाणी!

0

जळगाव । जिल्हा सामान्य रूग्णालयात एनआरएचएम’ अंतर्गत नवीन इमारत बांधकाम सुरू आहे. या इमारतीमध्ये एनआरसी सेंटर म्हणजे कुपोषित बालकांसाठी कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामासह ग्णालय परिसरातील समस्यांची तसेच स्वच्छतेची पाहणी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गुरूवारी केली. तसेच त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.

जिल्हा रूग्णालयातील सर्व विभागांना दिल्या भेटी
जिल्हा सामान्य रूग्णालयात गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जावून सर्व विभागांची पाहणी करून दुरूस्तीच्या कामांची पाहणी करत त्यात दुरूस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना दिल्या. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, डॉ. विजय जयकर, पीडब्ल्यूडीचे अभियंता सुर्यवंशी उपस्थित होते. यात प्रामुख्याने जिल्हा सामान्य रूग्णालयात सुरू करण्यात येणार्‍या कुपोषित बालकांसाठीच्या कक्षाची पाहणी करून काम लवकर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच रूग्णालयातील पोलिस चौकीचा आकार वाढविण्याच्या दृष्टीने प्लायवूड आणि पत्रांच्या सहाय्याने सोमवारपर्यंत काम पुर्ण करण्याचे सुचना दिल्या.

वार्ड दुरूस्तीसाठी 75 लाख
जिल्हा रूग्णालयातील वार्ड क्रमांक 7, 8 आणि 9 यामध्ये घाण आणि दुर्गंधी पसरलेली आहे. शिवाय, उपचारासाठी दाखल रूग्णांसाठी येथे पुरेशा सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने दुरूस्तीचे काम रूग्णालय प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. याकरीता 75 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असून, याची पाहणी करत जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी खर्चाबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या. त्याचप्रमाणे रूग्णालयाच्या संपुर्ण परिसरात भुयारी गटारी बांधकामास देखील जिल्हाधिकारी यांनी हिरवा सिग्नल दिला आहे.

एआरटी सेंटरला 25 संगणक
रूग्णालय आवारात एड्स बांधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र एआरटी सेंटरची इमारत आहे. या इमारतीची देखील पाहणी करत इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ रूग्णांना बसण्यासाठी पत्री शेळ आणि खुर्च्यांची सुविधा, आवारात महिला व पुरूषांसाठी नवीन स्वच्छता गृह बांधकाम करण्यास होकार दर्शविला असून, यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. तसेच एड्सग्रस्तांची माहिती अपडेट ठेवण्यासाठी विभागाला 25 संगणक आणि 25 प्रिंटर देण्यास मंजुरी दिली.

लवकरच सिटी स्कॅन सुविधा
सामान्य रूग्णालयातील सिटी स्कॅन मशिनचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. रूग्णालयात मशिन येवून पडले असताना देखील याचा शुभारंभ अद्याप झालेला नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे सदर मशिन सुरू होण्यास विलंब होत आहे. अशात जिल्हाधिकारी यांनी सदर यंत्रणेची पाहणी करत सिटी स्कॅन मशिन लवकर सुरू करण्याच्या सुचना दिल्या. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या ट्रान्सफॉर्मरला चार्ज करून देण्याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांना आदेश दिले. ट्रान्सफॉर्मर चार्ज केल्यानंतर मशिन सुरू करण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामुळे रूग्णांना याचा लवकरचा लाभ घेता येणार आहे.