जळगाव: जिल्हा नियोजन समितीतर्फे जिल्ह्यातील विविध यंत्रणांना वितरित केलेला कामांसाठीचा निधी पडून असल्याची बाब ऑडिट करणार्या पथकाने जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आज आणून दिली. यामुळे जिल्हाधिकार्यांनी तातडीने सर्व विभागाच्या प्रमुखांकडून निधी खर्च झाल्याचा अहवाल मागितला असून लवकरच बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा नियोजन समितीतर्फे आर्थिक वर्षात कोट्यवधींचा निधी बांधकाम विभाग, सिंचन विभाग, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, आदिवासी कल्याण विभाग, महिला व बाल कल्याण आदी विभागांना विविध विकास कामे करण्यासाठी दिला जातो. ज्या प्रमाणात निधी वितरित केला गेला त्याप्रमाणात तो खर्च झालेला नाही. अशी बाब जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या ऑडिट पथकाच्या लक्षात आली. गेल्या आठ दिवसांपासून विविध विभागाने केलेल्या खर्चाचे ऑडिट सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने ऑडिट करणार्या पथकाने आज दुपारी जिल्हाधिकार्यांच्या समोर हीबाब उघड केली.