जळगाव । धरणगाव नगरपालिकेतील मनमानी कारभार व नागरिकांच्या विविध समस्या याबाबत भारतीय जनता पार्टी चे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी आज रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेवून व्यथा व्यक्त केल्या. निवेदनात म्हटल्यानुसार धरणगाव शहरात गेल्या 25 वर्षांपासून पाण्याची मुलभूत सुविधा देखील प्रशासनाकडून सुटू शकलेली नाही. 15 दिवसाआड पाणी पुरवठा नागरिकांना होत असतो. आणि पुरवठा होणारे हे पाणी जशेच्या तसे कोणत्याही प्रक्रियेविना नागरिकांना पिण्यासाठी देण्यात येते. जल शुद्धीकरणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. पाण्यात तुरटी व टी.सी.एल.पावडर टाकण्यासाठी ठेके दिले जातात. मात्र प्रत्यक्षात पाण्यात त्याचा वापर करण्यात येत नाही. सार्वजनिक नळांची व्यवस्था शोधून देखील सापडत नाही. असे असून देखील ज्या व्यक्तीकडे नळ कनेक्शन नाही अश्या व्यक्तींकडून देखील 500 रूपये पाणीपट्टी वसूल करण्यात येते. प्रशासनास माहिती देवून सदरची पाणी पट्टी रद्द करणेबाबत कळविलेले आहे. परंतु त्यावर कार्यवाही मात्र झालेली नाही. तसेच सध्या सुरु असलेला पाणी पुरवठा हा पिण्यास व वापरण्यास अयोग्य असल्याचा अहवाल महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आयोग्य सेवेच्या जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा, जळगाव कार्यालयाचे वैज्ञानिक यांनी दिलेला आहे.
मुख्याधिकारी त्यांच्या मर्जीने कार्यालयात येत-जात असतात. मुख्याधिकार्यांचा नियोजन शून्य कारभार आहे. नगरपालिका कार्यालयात साधी तक्रार पुस्तिका देखील उपलब्ध नाही. फोन वर तक्रार केल्यास फक्त एकली जाते. त्याची कोणतीही नोंद केली जात नाही. नगरपालिकेतर्फे सध्या सुरु असलेली कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची असून कोणताही अधिकारी कामावर हजर नसतो. ठेका घेणार्याचे नाव वेगळे असते पण प्रत्यक्षात काम मात्र नगरसेवक करीत असतात. या सर्व कामांची चौकशी करण्यात येवून त्यांची बिले (रक्कम) अदा करण्यात येवू नये. पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी होत असतांना धरणगाव नगरपालिकेने अद्याप पर्यंत या महात्वाकांशी योजनेबद्दल कोणतीही पाऊले उचललेली नाहीत.
नगरपालिकेच्या वेशेष व सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची गळचेपी केली जाते, म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येत नाही, एवढेच नव्हे तर विषयांचे वाचन देखील होत नाही व एखाद्या विषयास आमची मंजुरी आहे किंवा नाही हे मत मांडण्याशी संधी देखील दिली जात नाही. सरसकट सर्व 50 विषय मंजूर करून सभा अवघ्या 7 मिनिटात आटोपण्यात येते. तसेच शासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे असतांना मुख्याधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत असतात. आतापर्यंत झालेल्या सभा रद्द करण्यात याव्यात आपल्या अधिपत्याखाली सभा घेण्यात याव्यात. नवीन बसविण्यात आलेले एल.ई.डी. बल्ब निकृष्ठ दर्जाचे आहेत. बल्ब बसविण्यास महिना देखील झालेला नाही तरी त्यातील काही बल्ब सध्या बंद अवस्थेत आहेत. शौचालयाची स्वच्छता नसते कारणास्तव शौचालयात पाय ठेवण्याची देखील इच्छा होत नाही. तरी देखील नगरपालिकेस हगणदारीमुक्त घोषित करून पारितोषिक देण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांची स्थिती वाईट असून गरज नाही तेथे रस्ते आणि जेथे गरज आहे तेथे रस्ते केले जात नाही. आणि जी कामे केली जातात ती अतिशय निकृष्ठ दर्जाची केली जातात. त्याच त्याच ठेकेदारांना कामे दिली जातात.
राजेंनी घेतली तत्काळ दाखल
पदाधिकार्यांनी दुषित पाण्याचे नमुने जिल्हाधिकार्यांना दाखविण्यासाठी आणले होते. सदरचे नमुने पाहून मुख्याधिकार्यांशी तत्काळ संपर्क साधून विचारणा केली तसेच जिल्हा परिषदेतील श्री कानडे यांना उद्याच नगरपालिकेत पाठवितो असे सांगितले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना धरणगाव नगरपालिकेच्या कारभारासंदर्भात आपण प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करण्याची विनंती केली असता. जिल्हाधिकार्यांनी लवकर भेट देतो असे सांगितले. शिरीष बयस, तालुका अध्यक्ष संजय महाजन, जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, पुनिलाल महाजन, न.पा.गटनेते कैलास माळी, नगरसेवक भालचंद्र माळी, शरद कंखरे, ललित येवले, कडूसिंह बयस, गुलाब मराठे, सुनील वाणी, मधुकर रोकडे, अड.शरद माळी, सचिन पाटील, कांतीलाल महाजन आदी उपस्थित होते.