वेळीच गुन्हा दाखल झाल्यास घटना टळतील ; उशीराने गुन्हा दाखल करण्याचे कारण समजेना
जळगाव :- महसुल विभागाच्या भरारी पथकांनी जप्त करुन जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेली वाळूची वाहने पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला. गुन्ह्यात जिल्हापेठ पोलिसांनी एक विना नंबरचे ट्रॅक्टर तसेच एक ट्रक अशी दोन वाहने ताब्यात घेतली आहे.
तहसीलदार वैशाली हिंगे, शिरसोलीचे तलाठी भरत नन्नवरे, फुपणीचे तलाठी अनिरुद्ध खेतमाळस यांच्या पथकाने बांभोरी गावाजवळ गुरुवार (ता.25 जून) रोजी वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक (एमएच-19, झेड-4548) ताब्यात घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला होता. या ट्रकचे मालक व चालक यांना तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम-48 पोटकलम 7 व 8 (1)(2) नुसार दंडात्मक कारवाईची नोटीस काढलेली होती; परंतु ही दंडात्मक नोटीस बजावण्यापूर्वीच वाहनचालक नारायण दौलत बाविस्कर याने तो ट्रक कोणताही दंड न भरता दोन ब्रास वाळूने भरलेला ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून 12 जुलै रोजी पळवून नेला. झोपेत असलेल्या कलेक्टोरेट’ ला हा प्रकार 18 दिवसानंतर समजला, नंतर महसुल प्रशासनातर्फे जिल्हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. हा ट्रक जिल्हापेठ पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतला.
विनानंबरचा ट्रॅक्टरही ताब्यात
जिल्हाधिकारी कार्यालयात जप्त करुन ठेवण्यात आलेला विनानंबरचा ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्यातील वाळूसह दहा दिवसांपुर्वी पळवून नेला होता. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी दाखल गुन्ह्यात उपनिरीक्षक मनोज वाघमारे, प्रशांत जाधव, नाना तायडे, अविनाश देवरे, उमेश पाटील अशांच्या पथकाने दाखल गुन्ह्यातील ट्रॅक्टरचा केवळ चेचिस नंबरवरुन शोध घेत हरिविठ्ठल नगर येथून ताब्यात घेतला. संदिप हटकर याच्या मालीकचा हा ट्रॅक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तत्काळ गुन्हे दाखल व्हावे
महसुल प्रशासनाकडून जप्त वाळू वाहनांवर तत्काळ गौणखनीज चोरीचे गुन्हे दाखल करुन चालक मालकांना अटक केल्यास जप्त वाहने पोलिसांच्या ताब्यातच राहतील, न्यायालयाच्या आदेशानंतर हि वाहने सोडता येतील. केवळ महसुली दंड वाढवून मिळावा सोबतच संबधीत विभागाच्या अधिकार्यांना चिरीमिरीची सोय व्हावी म्हणुन संबधीतांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.