जिल्हाभरातील आरपीआय गवई गट रीपाइं आठवले गटात विलीन होणार

0

रमेश मकासरे यांची पत्रकार परीषदेत माहिती : 25 रोजी जळगावात होणार ऐतिहासीक अधिवेशन

भुसावळ- जिल्हाभरातील आरपीआय गवई गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात प्रवेश करीत असल्याची माहिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष रमेश मकासरे यांनी शनिवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, भुसावळातील गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह शेकडो पदाधिकारी तसेच वॉर्ड शाखा व कार्यकारीणीतील पदाधिकारी आठवले गटात प्रवेश करीत आहेत. शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात 27 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता हा प्रवेशोत्सव सोहळा पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होत असून राजू सूर्यवंशी यांना ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देणार असल्याची माहिती मकासरे यांनी दिली.

सर्वांसाठी पक्षाची द्वारे खुली -मकासरे
मंत्री रामदास आठवले यांना मानणारा मोठा वर्ग असून जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळावी, सर्व समावेशक व समाज घटकांचा पक्ष व्हावा यासाठी आम्ही सर्वांसाठीच पक्षाची द्वारे खुली करीत असल्याचे मकासरे म्हणाले. मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राजू सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या पत्नी पूजा सूर्यवंशी, माजी नगरसेविका नंदा निकम, प्रकाश निकम, दलित पँथरचे सुदाम सोनवणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते 27 रोजी आरपीआय आठवले गटात प्रवेश करीत आहेत. यापुढे गाव तेथे शाखा याप्रमाणे एक हजार शाखा आम्ही उघडणार असून जिल्ह्यात गवई गटाची शाखाही नसणार असल्याचा दावा मकासरे यांनी प्रसंगी केला.

अस्तित्व नाही म्हणूनच आम्हाला किंमतही नाही
विविध पक्ष व संघटनांमुळे आम्ही विखुरले गेलो आहोत त्यामुळे आता एकत्रीकरणाशिवाय पर्याय नाही, असे सांगत मकासरे म्हणाले की, आमचे अस्तित्व नाही म्हणून आम्हाला किंमतही नाही त्यामुळे आम्ही सर्व गट-तट, मतभेद विसरून सर्व जण एकत्रीत येवून सलोखा व ऐक्य प्रस्थापीत करणार आहोत. 25 सप्टेंबर रोजी मंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ऐतिहासीक अधिवेशन होणार असून या अधिवेशनात आम्ही पक्षाची ताकद दाखवून देऊ, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

राजू सूर्यवंशी यांना जिल्हाध्यक्षपदाची जवाबदारी
भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते व आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचा पक्षात प्रवेश होणार असून त्यांना आरपीआय आठवले गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात येणार असल्याची रमेश मकासरे यांनी प्रसंगी सांगितले तर शहर जिल्हाध्यक्षपदी रवींद्र खरात तसेच जिल्हाप्रमुख पदावर आनंद बाविस्कर यापुढे काम सांभाळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
खान्देश विभाग अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उत्तर महाराष्ट्र सचिव रवींद्रनाथ तायडे, जळगाव जिल्हाप्रमुख आनंद बाविस्कर, जिल्हाध्यक्ष व नगरसेवक रवींद्र खरात, नितीन ब्राह्मणे, सुनील अंभोरे, दीपक लोखंडे, प्रकाश सोनवणे, दिलीप मोरे, दादाभाऊ निकम, शरद सोनवणे, विश्‍वासत खरात, प्रशांत मोरे, सुदाम सोनवणे, भगवान निरभवणे, सोनू सपकाळे, विनोद सोनवणे, रवी लोखंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.